अग्नितांडवातून पांडव बचावले
आणि इतर चार बंधूनी लाक्षागृहाच्या वेगवेगळ्या दिशेने अग्नी दिला शेवटी सर्व युधिष्ठिराच्या कक्षात येऊन जेथून भुयार खोदला आहे, तेथुन हळू हळू भुयारात जाऊ लागली. तो विवर ज्या गुप्तचराने खणले आहे तो सर्वांत पुढे त्या पाठीमागे युवराज युधिष्ठीर, माता कुंती, नकुल सहदेव, अर्जुन आणि शेवटी भीमसेन असे त्या विवरातून थेट गंगाकिनारी निघाले. पाठीमागे वळून सर्वजण पाहू लागले, तो अग्नी संपूर्ण लाक्षागृहाला एका क्षणात भस्म करून टाकेल अश्या प्रकारच्या ज्वाला आकाशाच्या दिशेने झेपावत होते. तो भयंकर अग्नी तांडव पाहून वारणावत नगरांतील नगरजण मोठा आक्रोश करून ती आग विझविण्याचा प्रयत्न करत होते. पण तो अग्नी अति विशाल रूप धारण केला होती. तेव्हा हे दृश्य पाहून माता कुंतीच्या डोळ्यातून अश्रू आले. कुंती म्हणाली "आम्ही काय कुणाचे वाईट केले होते भगवंता, कसली शिक्षा करतोस आमच्यावर ? " तेव्हा युधिष्ठीर माता कुंतीला समजावून शांत करतो, मग भीमाने माता कुंतीला आपल्या खांद्यावर घेतले, आपल्या दोन्ही कमरेवर नकुल आणि सहदेव मागे घेऊन निघाला सर्वांत पुढे गुप्तचर, युधिष्ठीर आणि सर्वांत पाठीमागे अर्जुन या प्रमाणे गंगाकिनारी पोहचले. ( महाभारत आदिपर्व अध्याय १४७ श्लोक १२२ )
पांडव गंगाकिनारी पोहचले
गंगाकिनारी आल्यावर गुप्तचर ने विचित्र पक्षीचा आवाज काढला तेव्हा झाडीमध्ये दडून बसलेले काही नावाडी बाहेर आले त्यांनी युवराज आणि माता कुंतीला प्रणाम केला. तेव्हा पाच पांडव आणि माता कुंती त्या नावे मध्ये बसले तो गुप्तचर युधिष्ठिराला म्हणाला " युवराज हे माझे सहकारी आहेत तो तुम्हाला गंगा पार करवतील, मला महात्मा विदूरने इथपर्यंत आपल्याला लाक्षागृहातून सुरक्षितपणे बाहेर काढून या गंगा नदी किनाऱ्यापर्यंत पोहोचवायला सांगितले आहे मला तो विवर पुन्हा बंद करायचा आहे त्याने कोणताच संशय उरणार नाही. तेव्हा युवराज आता आपण त्वरित नावेत बसून गंगा पार व्हावे ही विनंती." युधिष्ठीर म्हणाला " गुप्तचर, आम्ही आपले शतशः आभारी आहोत." आणि प्रणाम केला तेव्हा तो गुप्तचर लगेच युधिष्ठीरचे हात पकडत म्हणाला " नाही, नाही युवराज हे काय करताय हे तर माझे कर्तव्यच आहे." युधिष्ठीर म्हणाला " आम्ही गंगा पार करून पुढे कोठे जावे ? काकाश्री विदूर यांचे काय मत आहे ? गुप्तचर म्हणाला " युवराज महामंत्री विदुर यांच्या मते, पुढे आपण सर्व गंगापार करून त्या पलिकडील वनांचा आश्रय घ्यावा हस्तिनापूर येथील परिथिती शांत झाल्यावर आपणास कळवले जाईल. तो पर्यंत आपण आपली ओळख गुप्त राखावी. कोणत्याही नगरांत जाऊ नये शकुनीचे गुप्तचर शोध घेत असावेत, तेव्हा आपण जपून, एकत्र, सुरक्षित राहावे. असा विदुरजीनी आपणांस संदेश दिला आहे." युधिष्ठीर म्हणाला " जशी काकाश्रीची इच्छा, त्यांना आमचा प्रणाम सांगा." असे म्हणून सर्वजण नावेत बसले आणि गंगेच्या पाण्यात ती नाव हळूहळू पुढे जाऊ लागली.
हस्तिनापूरमध्ये शोकाकुल वातावरण
इकडे वारणावतांमध्ये लाक्षागृहाला अग्नी लागून जो काही अग्नी तांडव होऊन कुंती सहित पाच पांडव नष्ट झाले ही वार्ता कळाल्यावर संपूर्ण हस्तिनापूरमध्ये शोकाचे वातावरण पसरले, सम्राट धृतराष्ट्र यांनी राज्यांत दुखवटा जाहीर केला, स्वताः पितामह भिष्म, विदुर, शकुनी आणि महत्वाचे मंत्रीगण सहित सर्व त्यांचे त्यांची अस्थी एकत्र करून अंत्यविधी करण्यासाठी गेले.
पांडव अंत विधि श्राध्दकर्म
वारणावतामध्ये लाक्षागृहात पांडव जळाले त्या जागेवर येऊन राखेमध्ये पांडवांचे अस्थि एकत्र करू लागले, तेव्हा त्यांना अनेक अस्थि आढळून आल्या, कारण त्यांच्या म्हणण्यानुसार पांडवांशिवाय पुरोचनचा परिवार आणि दास - दासी हे सुध्दा या अग्नी मध्ये नष्ट झाले असावेत. ते सर्व अस्थि एकत्र करून हस्तिनापूरमध्ये आले तेव्हा मुख्य मार्गाच्या दोन्ही बाजूस जनसागर आला होता, आक्रोश करत होते, मोठमोठ्याने रडत त्यामागे जात होते. शोकग्रस्त आवस्थेत सर्व जण गंगेच्या किनाऱ्यावर थांबले पितामह भिष्म, महात्मा विदुर, सम्राट धृतराष्ट्र यांनी गंगेच्या शुध्द पाण्यात त्यांचे अस्थि विसर्जन केल्या.
विदुराचे भीष्मांना सत्यकथन
पितामह यांना या वृध्दअवस्था हा आघात न झेपावणारा होता. याची पूर्ण कल्पना विदुराला होती. तेव्हा गंगाकिनाऱ्याहून हस्तिनापूरकडे जात असताना महात्मा विदुर पितामह भिष्म यांच्या रथाचे सारथ्य करतात आणि तो रथ हस्तिनापूरच्या दिशेने न घेता एका वनांच्या दिशेने घेतात, निर्जन जागा पाहून विदुर रथ थांबवुन भीष्मांना रथातून बाहेर येण्याची विनंती करतात, भिष्म म्हणाले " पुत्र विदुर मला या निर्जन अरण्यामध्ये का आणलेस ?" विदुर म्हणाले " तातश्री, मला आपले दुःख पाहावले नाही." अत्यंत दुःखी होऊन भिष्म म्हणाले " कसे पाहवणार पुत्र माझे नातु, या वृध्द आजोबा पेक्षा लवकर गेले मग दुःख नाही का होणार ?" विदुर म्हणाले " ताताश्री आपण या दुःखाचा त्याग करावा, आपले पांडव आणि कुंती जिवंत आहेत." या विदुराच्या बोलण्यावर विश्वास बसला नाही भिष्म आश्चर्य चकित होऊन म्हणाले " काय कुंती आणि पांडव जिवंत आहेत ? तू खरे कथन करतोस ना, मग आपण हे कोणाचे अस्थि विसर्जन केलेत ? कसे काय घडले हे मला सविस्तर सांग पुत्रा " तेव्हा महात्मा विदुरांनी सर्व वृत्तांत विस्तृतपणे पितामह भीष्मांना कथन केला. तेव्हा भीष्मांचे मन शांत झाले आणि दोघेही हस्तिनापूरकडे निघून गेले. ( महाभारत आदिपर्व अध्याय १४९ श्लोक १८-१९ )
To be continued...