युधिष्ठिराचा राज्याभिषेक
हस्तिनापूर राज्यामध्ये कौरव आणि पांडव यांच्यात वैर भाव वाढतच होता. रंगमंचाच्या प्रदर्शनाने तो अधिकच वाढला. सम्राट धृतराष्ट्र, धनुर्धारी अंगराज कर्ण, दुर्योधन, दुःशासन, मामा शकुनी यांच्यामुळे त्यांच्यातील व्देष अधिकच वाढला, पण हस्तिनापूरच्या प्रजेचे सम्राट पांडुवरील प्रेम, आणि पांडवांवरील आपुलकी वाढू लागली. या कारणाने धृतराष्ट्र यांनी मंत्रीमंडळ आणि प्रजेच्या दबावाने युवराज पदावर आपला जेष्ठ पुत्र दुर्योधन यास न बसवता जेष्ठ पांडू पुत्र युधिष्ठीर याची नेमणूक नाईलाजाने करावी लागली. नेमकी हिच घटना शकुनी, दुर्योधन, दुःशासन यांना सहन झाली नाही. त्यांनी दुर्योधन युवराज पदावर बसावेत यासाठी काय करावे याचा ते विचार करू लागले.
शकुनी आणि पुरोचन यांनी मिळून मिसळून काहीतरी षडयंत्र रचले असावे, असा वारंवार महामंत्री विदुर यांना सारखा संशय येत होता पण तो कोणासाठी आहे ते मात्र कळत नव्हते. पुरोचन हे वास्तूविशारद होते. त्यांचे शकुनीच्या कक्षाकडे येणे जाणे वाढले होते. महामंत्री विदुर यांनी आपल्या गुप्तहेरांना योग्य सूचना दिल्या होत्या, पण काही केल्या त्यांच्या मनात काय शिजतंय याची किंचितही ते माहिती लागू देत नसत.
वारणावत नगरजणांकडून आमंत्रण
कुरु साम्राज्याच्या युवराजाला गादीवर बसून एक वर्ष उलटले होते, तेव्हा दरबारात वारणावत नगरांतील काही प्रमुख नगरजन आले होते, तेव्हा महामंत्री विदुर यांनी विचारले " सम्राट वारणावत नगरांतील काही नागरीक आपल्याला भेटावयास आले आहेत, आपण आज्ञा दयावी." सम्राट धृतराष्ट्र म्हणतात " त्यांना सन्मानाने घेवून या. " तेव्हा वारणावत नगरजन दरबारात येतात. त्यांनी सम्राट धृतराष्ट्र, पितामह भीष्म, महामंत्री विदुर, युवराज युधिष्ठीर, मामा शकुनी, या सर्वांना प्रणाम केला. महामंत्री विदुर म्हणाले "बोला, आपण का आलात, आपली काय समस्या आहे ?" त्या नगरजना पैकी एक जण म्हणाला " सम्राट धृतराष्ट्र यांचा विजय असो, सम्राट आम्ही वारणावत या नगरातून आलो आहोत, त्या ठिकाणी देवादिदेव महादेव यांचे खूप जुने मंदिर तेथे दरवर्षी शंभु महादेव यांचा खूप मोठा उत्सव साजरा केला जातो. कुरु राजघराण्यातील राजा किंवा युवराज हे वंश परंपरेनुसार या उत्सवाला येत असतात. त्या प्रमाणे या वर्षीही आपण येऊन आम्हा वारणावत नागरजणांना उपकृत करावे, अशी आमची इच्छा आहे." सम्राट धृतराष्ट्र हसत म्हणाले, हे वारणावत नगरजन हो, मी असा अंध मी काय करणार तिथे येऊन, आणि काय पाहणार, पण मी तुम्हाला नाराज नाही करणार आपल्या कुरु राष्ट्राच्या नवीन युवराज युधिष्ठीर यांना विचारा ते जर या उत्सवाला येणार असतील तर माझी काही हरकत नाही." नगरजन युवराजांना विनंती करतात. युवराज युधिष्ठीर आपल्या आसनावरून उठून उभे राहून म्हणाले " सम्राट आपली आज्ञा असेल तर मी अवश्य जाईन." सम्राट धृतराष्ट्र म्हणाले, पुत्र युधिष्ठीर तु या उत्सवाला अवश्य जावेसे त्या बरोबरच तुझे बंधु, माता कुंती यांनाही सोबत घेऊन जावेस खूप दिवस झाले कुंती कोठेही नाही गेली तेवढेच देवदर्शनाने तिच्या मनाला सुख प्राप्त होईल." युधिष्ठीर म्हणाला "जशी आपली आज्ञा, महाराज आजच आम्ही जरूर वारणावत नगराला, महादेवांच्या उत्सवाला अवश्य भेट देऊ." असे म्हणून युधिष्ठीर आपल्या महालाकडे निघून गेले.
युधिष्ठीर-विदुर यांची भेट
सम्राट धृतराष्ट्र यांच्या आदेशानुसार युवराज युधिष्ठीर सह आपले चार बंधू, माता कुंती या बरोबर वारणावत नगराला प्रस्थान करण्यासाठी निघाले, सूर्य डोक्यावर तळपत होता. युधिष्ठिराला वाटले की आम्ही पांडव वारणावतला जात असताना काकाश्री विदुर यांचा निरोप घेतला असता पण विदुरजी आलेच नाही. इतर मंत्र्यांना विचारले असता ते म्हणाले विदुरजी काही कामानिमित्य हस्तिनापूर नगराबाहेर गेले आहेत. युधिष्ठिराचा राज्याभिषेक झाल्यापासून महात्मा विदुरजी युवराज्याच्या सुरक्षेविषयी अधिक जाकरूक, सजग होते. पांडवांचे रथ हस्तिनापूर नगराबाहेर निघाले, सर्वांत पुढे युवराज युधिष्ठीर यांचा रथ त्यात राजमाता कुंती, त्यांच्यामागे अर्जुन, भीमसेन, नकुल, सहदेव यांची चार रथ वारणावत नगराच्या दिशेने निघाले. खूप अंतर गेल्यानंतर लांब अंतरावर वाटेत एक रथ उभा असलेला दिसत होता. युधिष्ठीरने सारथीला रथ थांबवण्याचा आदेश दिला आणि म्हणाला " माता, ध्वजावरून तर काकाश्री विदुर यांचा हा रथ दिसतोय." असे म्हणून युधिष्ठीर त्या रथाच्या दिशेने पायीच निघाले. महामंत्री विदुर रथावरच बसून होते, युधिष्ठीर विदुरजींच्या चरणांवर मस्तक टेकवून प्रणाम केला आणि विदुरजी म्हणाले " दीर्घायू भव:, पुत्र युधिष्ठीर मला माझ्या गुप्तहेरांकडून असे कळले आहे की तुम्हांला वारणावत नगरात काही घातपात होण्याची शक्यता होऊ शकते, सावध राहा, तुम्ही सर्वजण दिवस मृगयाच्या निमित्याने बाहेर पडत राहा." युधिष्ठीर म्हणाला "आपण चिंता करू नये काकाश्री." विदुरजी म्हणाले, माझे गुप्तचर वेळोवेळी तुमचे रक्षण करण्यासाठी पाठवत जाईन, फक्त येवढेच सांगतो की, अरण्यात जेव्हा अग्नि प्रदीप्त होतो, वणव्याने संपूर्ण वन नष्ट होते, त्यातील प्राणी, पशु - पक्षी नष्ट होतात केवळ एकाच मूषक असा प्राणी आहे तो आपला प्राण वाचण्यासाठी भूमी खालून मार्ग तयार करून सुखरूप बाहेर पडतो." येवढे बोलून विदुरजी हस्तिनापूरच्या दिशेने निघून गेले. युधिष्ठिराच्या मनात काकाश्रीनी म्लेंछ भाषेत जे भाष्य केले तेच कानांत घुमत होते. मग पांडवही वारणावताच्या दिशेने निघून गेले.