रामायणातील कथा
द्रोण शिष्यां कडून पराभव झाल्यामुळे द्रुपदाला फार दुःख झाले, झालेल्या पराभवाचा सूड घेल्याशिवाय मन स्थिर होत नव्हते. क्षत्रियतेज ब्राम्हतेजासमोर निस्तेज पडले, त्याच ब्राम्हतेजाचा नाश करण्यासाठी एक महान पुत्र असावा असेच पृषतपुत्र द्रुपदाला वाटू लागले. मनात आचार्य द्रोण यांना मारण्याचा विचार येत होता. पण द्रोणाचार्य ब्राम्हण असल्याने ब्रम्हहत्याचे पातक कोण घेणार याच विचाराने ते सदा व्याकुळ राहत होते. ही व्याकुळता पाहून पांचालच्या मंत्री पैकी कोणीतरी एकांनी त्यांना रामायणातील कथा सांगितली, अयोध्येतील चक्रवर्ती राजा दशरथाची, मंत्री म्हणाले " हे राजन !, पांचालधिपती फार पूर्वी त्रेतायुगामध्यें अयोध्या नामक राज्यांतील शूर राजा दशरथ हे पृथ्वीवरीलच नव्हे तर देवांनासुध्दा त्यांची मदत घ्यावी लागली येवढे महान राजा राज्य करत होते, पण मनात एक दुःख सतत सलत होते ते म्हणजे निपुत्र असल्याची, त्यांना महान पुत्राची अपेक्षा होती, त्यांनी ब्रम्हर्षी वशिष्ठ यांच्याकडून पुत्रकामेष्ठी यज्ञ करून घेतला तेव्हा त्यांना यज्ञातुन अग्नी प्रकट होऊन पायसचे दान दिले. दशरथानी ते पायस आपल्या तिन्ही पत्नीस म्हणजे कौशल्या, सुमित्रा आणि कैकयी यांना समान रूपात दिले. तेव्हा त्याचे फलित म्हणून कौशल्येला राम, सुमित्रेला लक्ष्मण, आणि कैकयीला भरत आणि शत्रूग्न असे चार पुत्र उत्पन्न झाले. राजन ! त्याप्रमाणे आपणही एका सिद्ध ऋषी मुनी करवी पुत्रकामेष्टी यज्ञ करून द्रोणाचार्यांचा वध करेल असा पुत्र प्राप्त करून घ्यावा." हा विचार द्रुपदला मान्य झाला कारण त्यांना माहीत होते की समस्त पृथ्वीवरील कोणताच क्षत्रिय अस्त्रवेत्ता, ब्रम्हास्त्रधारी, भारद्वाज पुत्राला, द्रोणाचार्याला हरवू, मात देऊ शकत नाही. त्यासाठी दैवी गुण असलेला एक महान क्षत्रिय पुत्र, पुत्रकामेष्ठी यज्ञाद्वारे प्राप्त करून घ्यावा, जो द्रोण वध करू शकेल. पण अडचण ही होती की कोण हे यज्ञ करणार.?
याज आणि उपयाज ऋषी
द्रुपद राजाने आपल्या पांचाल राज्यात दवंडी पेटवली की, पुत्रकामेष्टी यज्ञ करेल अशा ऋषी - मुनी यांना आमंत्रित करून त्यांना मागेल तेवढे गोधन दिले जाईल. पण हा यज्ञ फक्त पुत्रकामेष्टी यज्ञ नव्हता तर एका ब्राम्हणाची, ब्रम्हहत्येचे पातक डोक्यावर घेण्यासारखे होते. त्यामुळे हा यज्ञ कोणीही करण्यास तयार होत नव्हते. तेव्हा द्रुपदला महान तपस्वी ' याज 'आणि ' उपयाज 'या दोन ऋषी बंधु विषयी कळले. द्रुपद ' याज 'आणि ' उपयाज 'या ऋषी बंधूंची सेवा करण्यासाठी त्यांच्या आश्रमात दाखल झाले. प्रथम ते हा यज्ञ करण्यास तयार नव्हते पण द्रुपद राजाची मनोभावें सेवा पाहून शेवटी त्यांनी पुत्रकामेष्टी यज्ञ करण्यास होकार दिला. (आदिपर्व अध्याय १६६, श्लोक १७ - ३३)
पुत्रकामेष्टी यज्ञ
यज्ञ करण्याचा दिवस ठरला, सिध्द - ऋषी, तपस्वी ' याज 'आणि ' उपयाज 'या दोन ऋषीनी पुत्रकामेष्टी यज्ञ प्रारंभ केला. मंत्राचे उच्चारण सुरु झाले, हवनात धृताच्या आहुत्या पडू लागल्या, यज्ञातील अग्नी भडकू लागला. तेव्हा काही कालावधीत याज ऋषी म्हणाले," हे राजन, तू मागितले आहे त्या प्रमाणे तुला महान, महातेजस्वी, पराक्रमी, शक्तिशाली पुत्र होईल. तेव्हा उपयाज ऋषी यांनी द्रोणाचार्यांचा वध करेल असा पुत्र प्राप्त होवो असा संकल्प केला आणि शेवटची यज्ञात आहूती दिली. याजने स्वतः तो दिव्य प्रसाद तयार केला होता आणि उपयाज यांनी त्या दिव्य प्रसादाला अभिमंत्रित केले होते. पण यज्ञाचा दिव्य प्रसाद घ्यायची जेव्हा वेळ येते तिथे द्रुपद पत्नी सौत्रामणी उपस्थित नव्हते, त्यांना परतण्यास उशिर झाला. याज ऋषी म्हणाले " हे देवी तुम्ही आलात किंवा नाही आलात तरीही हा प्रसाद यजमानांचे कार्य पूर्ण करणारच " असे म्हणून त्या दिव्य प्रसादाची त्यांनी यज्ञाच्या अग्नीतच आहूती दिली.
धृष्टधुम्न जन्म
त्या यज्ञातील धगधगत्या अग्नितून एक दिव्य, तेजस्वी, धगधगत्या ज्वाला समान, एक दैवी मनुष्याची आकृती निर्माण होऊ लागली. पिवळा धमक सोनेरी मुकुट मस्तकावर शोभून दिसत होता. त्याचा धिप्पाड शरीरयष्टी, अग्नीसारखा प्रखर, तेजस्वी चेहरा, खांदयावर धनुष्य बाण, आणि हातात खङग धारण केले होते. उपयाज ऋषी म्हणाले " हा अग्निसमान कुमार तुम्हां पांचालांचें दुःख दूर करणार आहे, महाराज द्रुपद यांचे मनोरथ पूर्ण करणार आहे. द्रोणाचार्य वधासाठी याचा जन्म झाला आहे."
द्रौपदी जन्म
त्याबरोबरच त्या यज्ञातून एक सुंदर कन्या ही उत्पन्न झाली. ती खूप सुंदर होती. काळेभोर मोठ - मोठे कमळ उमलल्यासारखे डोळे, लांब सडक, काळे, घुंगराळे केश, तिच्या शरीरातून नीलकमलाच्या फुलासारखा सुगंध येत होता. संपूर्ण आर्यावर्तात हिच्या सारखी सुंदर स्त्री कोणीही नाही, सावळी रंगाची श्यामा, कृष्णा, पांचाली, द्रौपदी या नावाने ओळखली जाईल. असे याज ऋषी म्हणाले. पण पांचालनरेश द्रुपद त्या कन्येला स्विकार करण्यास तयार नव्हते, यांना फक्त द्रोण वधासाठी पुत्र हवा होता. तेव्हा याज ऋषी म्हणाले " हे राजन, या पुत्रा सोबतच ह्या देव इच्छानुसार या कन्येचा सुध्दा तू स्वीकार कर, ही कन्या तुझे भविष्य आहे, ही कन्या तुझ्या शत्रूंचा काळ बनेल, क्षत्रियांचा संहार करण्यासाठी या कन्येचा जन्म झाला आहे. असे म्हटल्यावर द्रुपदाने त्या कन्येचा स्वीकार केला. योग्य वेळी त्या ऋषींनी त्या यज्ञपुत्राचे नाव धृष्टधुम्न असे ठेवले, आणि कन्येचे नाव याज्ञसेनी द्रौपदी असे ठेवले.