रविवार, २५ डिसेंबर, २०२२

पांचालवर आक्रमण आणि द्रुपद आगमन

 

दुर्योधन की युधिष्ठीर





सर्व कौरव, पांडव आपल्या सर्व शस्त्र सहित चर्मण्वती नदी ओलांडून पांचाल राज्यात प्रवेश केला, एक छोटी तुकडीच भासत होती, पण काही अंतर गेल्यावर दुर्योधन आपल्या सर्व बंधू सह एके ठिकाणी थांबला, त्याने जेष्ठ पांडव युधिष्ठीरला म्हणाला " हे युधिष्ठीर, मला आपल्या साहाय्याची आवश्यकता नाही, मी आणि माझे बंधुच पांचालनरेश द्रुपदला बंदी करण्यासाठी पर्याप्त आहेत. आपण वापस जावे." युधिष्ठीर म्हणाला " नाही दुर्योधन, मी जेष्ठ आहे आणि तुमच्या सर्वांची जबाबदारी माझी आहे." दुर्योधन हसत म्हणाला " तुम्ही रक्षण करणार का ? तर चला मग तुमच्यात आणि माझ्यात द्वंद्व करून पाहू की कोण अधिक बलशाली आहे ? आणि जो जिंकेल तोच द्रुपदाला बंदी करेल " युधिष्ठीर म्हणाला " हे बंधू, सुयोधना दोन लाकडात जेव्हा घर्षण होते तेव्हा अग्नि निर्माण होऊन संपूर्ण वन जळून जाते त्या प्रमाणे दोन बंधुमधील वाद संपूर्ण कुठुंम्ब नष्ट करते. हस्तिनापूरच्या सीमेवरच कुरुकुमार आपसातच युध्द नाही करू शकत." दुर्योधन रागाने म्हणाला " मला प्रवचन नको आहे, निर्णय सांगा." युधिष्ठीर म्हणाला " हे सुयोधना, आपल्यातील वाद हा आपल्यातच राहावा, आपल्यात युध्द म्हणजे कुरु वंशाचा आणि आपल्या पूर्वजांचा अपमान होईल. तेव्हा मी जेष्ठ म्हणून तुला आदेश देतो की, जा पांचाल नरेश द्रुपदाला बंदी करून घेऊन ये, मी तुला प्रथम संधी देतो जा, यशस्वी भव:" (आदिपर्व अध्याय १३७, श्लोक १ - १८).

कौरवांचे प्रथम आक्रमण

दुर्योधन आनंदी होऊन आपल्या सर्व शंभर बंधू सह रथांत बसून पांचालच्या दिशेने निघुन गेले. आणि मागे फक्त धुळीचे लोळ उठत राहिले. तेव्हा अर्जुन त्रागाने म्हणाला " जेष्ठ हे काय केलंत, दुर्योधनला का पहिले पाठवलेत." भीमसेन म्हणाला " आपण युध्दात भागच नाही घेतलो तर तर आपण विजयी कसे होणार ?" युधिष्ठीर स्थिर मनाने म्हणाला " अर्जुन - भीम हे लक्षात घ्या की, महारथी द्रुपद हा उत्तम धनुर्धर आहे. माझ्या या शंभर बंधुत असा कोणताच धनुर्धर नाही, जो महारथी द्रुपद यांचा सामना करू शकेल. आपली मदत त्यांना घ्यावीच लागेल मला काळजी एवढयाच गोष्टीचे वाटतंय की माझ्या शंभर कौरव बंधूंना द्रुपद कोणती इजा करणार नाही ना ?"





द्रुपद सेनापती शिखंडी

दुर्योधन आपल्या सर्व बंधू सोबत पांचालच्या राज्यावर भयंकर तुटून पडले, पांचाल चा काही भाग त्यांनी जिंकला पण त्यांना पांचालनरेश द्रुपदाला बंदी बनवायचे होते. कंपिल्यानगराच्या जवळ दुर्योधन व इतर बंधू जाऊन पोहोचले, नगरात प्रवेश करताच नगरातील नागरिकांनी भयंकर हल्ला चढवला. त्यांच्या रूद्र अवतार पाहून कौरव बंधू थोडे मागे हटले पण मागे येताच दुर्योधन, विकर्ण, दुःशासन पांचाल प्रजेच्या माऱ्याने मागे जाणाऱ्या बंधूंना धीर देऊन युध्दाला प्रवृत्त करत होते. तेवढ्यात भयंकर, कर्णकर्कश तुतारी, शंख, ढोल अश्या गगनभेदी आवाजासह पांचालनरेश द्रुपदच आला आहे की काय असे दुर्योधनाला वाटले, पण जवळ येताच कळले की हा द्रुपद नसून त्याचा सेनापती आहे. दुर्योधनाने आपल्या बंधूला अधिकच चेतवून त्या येणाऱ्या सैनिकांवर तुटून पडले. दुर्योधनाने सारथीला सांगून आपला रथ द्रुपद सेनापतीच्या रथाला भिडवायला सांगितला. प्रथम दोघांचे धनुष्य बाणाने युध्द करू लागले, दुर्योधनाने आपल्या बाणाच्या साहाय्याने शिखंडीच्या रथाचा ध्वज, सारथी, धनुष्य मोडून काढले, तेव्हा शिखंडी रागाने खङग घेऊन रथातून बाहेर आली.

दुर्योधन पण धनुष्य बाण रथात ठेवून वर्षा ऋतूतील ढग गर्जना करतात त्या प्रमाणे गर्जून आपल्या हातात अवजड गदा घेऊन रथातून उडी घेतली. दोघेही भयंकर युध्द करत होते पण शिखंडीची शक्ती थोडी कमी पडू लागली आणि काही वेळेतच दुर्योधनाने आपल्या गदेच्या भयंकर आघाताने मूर्च्छित केले, दोघांमध्ये भयंकर युध्द झाले. कौरव बंधू अधिक स्फूर्तीने लढले त्यांनी द्रुपद सेनापतीचा पराभव केला. मूर्च्छित पडलेल्या शिखंडीच्या मस्तकावरील युध्दाचा मुकुट कडून पहिले तर एक स्त्री सेनापतीचा वेष धारण करून आलेली होती. दुर्योधनला आश्चर्य वाटले तो मोठ्याने हसत म्हणाला " हे कुरु वीरांनो हे पहा पांचाल मधील सर्व पुरुष नपुसंक झाले आहेत की काय त्यांनी सेनापती म्हणून एका स्त्रीला युध्दात पाठविले आहे पहा."





द्रुपदचे हल्ल्याचे उत्तर

अचानक धनुष्याचा कर्णकर्कश टंकाराने सर्वांचे लक्ष्य वेधले कंपिल्यानगराच्या मुख्य मार्गाद्वारे मध्यान्हात सूर्य तळपतो त्याप्रमाणे स्वत: पांचालनरेश द्रुपद आपल्या श्वेत अश्वांच्या रथावरून येत होते, त्यांनी रणवेष धारण केला होता. चार अश्वांचा रथात द्रुपद धनुष्यबाण धारण केले होते, पाठीवर गच्च भरलेला बाणांचा भाता होता, डोक्यावर मुकुट, शरीरावर पोलादी कवच धारण केले होते. शंख, तुतारी, मृदूंग, ढोल, भेरी इत्यादी असंख्य वाद्ये वाजत होते. पांचाल सैन्य मोठ - मोठ्याने गर्जना करत द्रुपद रथाच्या पाठीमागे धावत येत होते. दुर्योधन आपल्या रथात परत येऊन धनुष्य धारण केले, पण द्रुपदाच्या पाच बाणाने धनुष्य, कवच, ध्वज, सारथी यांना ठार केले. द्रुपद आपल्या धनुष्याच्या आधारे वरुणदेव जसे वर्षा करतो त्याप्रमाणे बाणांची वर्षा करू लागले. बाणांची वर्षा करत सैनिकांना आदेश देत होते की," सैनिकांनो या एकशे पाच कौरव कुमारांपैकी एकही सुटता कामा नये सर्वाना बंदी करा." त्या बाणांच्या वर्षावाने मात्र कौरव घाबरून गेले, आणि माघारी पळू लागले. पण ज्या प्रमाणे अजगर आपल्या शरीराच्या विळख्याने आपले भक्ष्य जखडून ठेवतो त्याप्रमाणे पांचालच्या सैनिकांनी त्यांना अडवून दोरखंडाने बंदी केले. तेवढ्यात त्यांना हे कळले की, हे कौरव कुमार एकशे पाच नसून फक्त शंभर आहेत. द्रुपद अधिकच चवताळले त्यांनी सैनिकांना आदेश दिला की " सैनिकांनो, नगरांत या नगराबाहेर त्या पाच कुरु कुमारांचा लवकरात लवकर शोध घ्या, जा लवकर ."

to be continued....

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

हिडिंब राक्षस वध

   गंगाकिनारच्या वनांत प्रवेश  पांडव आपली माता कुंती सहित गंगापार करून नक्षत्रांच्या आधारे दक्षिण दिशेने चालत घनघोर अरण्यात निघाले. पांडव आ...