गंगाकिनारच्या वनांत प्रवेश
पांडव आपली माता कुंती सहित गंगापार करून नक्षत्रांच्या आधारे दक्षिण दिशेने चालत घनघोर अरण्यात निघाले. पांडव आणि माता कुंती आता पूर्णपणे थकले होते. कुंती म्हणाली " पुत्रांनो खूप तहान लागली आहे रे, कोणीतरी जल आणाल का ?" रात्रभरच्या पायी प्रवासाने सर्वांनाच आता खूप तहान लागली होती. सहदेव म्हणाला "भीम भ्राता ते पहा सारस पक्षी दिसत आहेत म्हणजेच जवळपास जलाशय आवश्य असणार " मग भीमाने एक जवळच असलेल्या विस्तीर्ण, सुंदर आणि गर्द सावली देणाऱ्या पिंपळाच्या झाडाखाली नकुल, सहदेव आणि माता कुंतीला खाली उतरविले. आणि म्हणाला " मी जल घेऊन येतो " असे म्हणून तो निघून गेला. भीमसेन ने आपल्या शरीरावरील वस्त्र जलाशयातील जलात भिजवुन तो घेऊन आला. तो पर्यंत माता झोपली होती. भीमाच्या मनात असे वाटू लागले की, एका समृध्द कुंतिभोज राजाची कन्या, द्वारकाचे राजा वसुदेव यांची भगिनी, हस्तिनापूर साम्राज्याची महाराणी आज वनांत एका वृक्षाखाली भूमीवर झोपली आहे, अरे, धिक्कार आहे आम्हा पाच - पाच महारथी पुत्रांचा धिक्कार आहे. तेव्हा सर्वांनी भीमाने आणलेले थोडे थोडे जल प्राशन केले, श्रमाने थकल्याने तेथेच निद्रिस्थ झाले. पण भीमास काही झोप येत नव्हती तो फक्त शकुनी, दुर्योधन यांनी केलेल्या कृत्याचा कसा प्रतिशोध घ्यावा याचाच विचार करत होता.
राक्षस हिडिंब आणि हिडिंबा
पांडव ज्या वनात निद्रिस्थ झाले होते ते वन हिंस्त्र पशु - पक्षी, आणि नरमांस भक्षक राक्षस यांचे होते. तेव्हा त्या वनाचा राक्षस राजा हिडिंब आपल्या राक्षस भगिनी हिडींबा सोबत राहत होता. हे राक्षस नरमांस भक्षक तर होतेच त्याबरोबर मायावी पण होते, आपले रूप लगेच बदलत असत. हिडिंब राक्षस याला वासावरून कळाले की पाच नरासोबत एक स्त्री पण आहे, त्याने आपल्या भगिनींचा सांगितले " हिडींबा, त्यांना आपल्या निवासस्थानी घेऊन ये जा, खूप दिवसांनी आपल्याला मनुष्याचे मांस मिळणार आहे त्वरीत जा. " हिडिंबाने आपले रूप एका सुंदर स्त्रीचे केले होते, ती जेव्हा पांडवांजवळ आली पांडव आणि कुंती थकल्याने निद्रिस्थ झाले होते, तेव्हा ती थक्कच झाली कारण भीम जागाच होता, त्याला निद्रा लागत नव्हती, मनुष्यामध्ये एवढा बलवान, धिप्पाड शरीरयष्टीचा मनुष्य हिडींबा प्रथमच पाहत होती, ती आता भीमावर पूर्णपणे मोहित झाली होती. तेव्हा भीमाने तिला पहिले आणि विचारले, " हे स्त्री कोण आहेस तू ?" हिडिंबा म्हणाली " हे मनुष्य मी राक्षसी हिडींबा आहे, माझा बंधू राक्षस राज हिडींब आपल्याला मारेल तुम्ही लवकरात लवकर येथून निघून जा." भीमाला काहीच कळेना, तो चक्रावून गेला की राक्षसी स्त्री असून आपली मदत का करत असावी ? हिडिंबा म्हणाली, " हे नरश्रेष्ठ, आपली शक्ती, आपली शरीरयष्टी पाहून मी मोहून गेले आहे, मी आपणाला मनोमन वरले आहे, पण भीती वाटते की माझा बंधु हिडिंब इथे केव्हाही येईल याची तेव्हा आपण सर्व लगेच निघून जावा."
भीम -हिडिंब युध्द
इकडे राक्षस हिडींब विचार करू लागला की, हिडींबा एवढा समय का लावत आहे त्या पाच मनुष्य आणि एक स्त्री यांना मोहवुन आणण्यासाठी ? या यापूर्वी कधी एवढा समय तिने नाही लावला. आता हिडींबला भूक अनावर होऊ लागली होती, आणि तो खुश पण होता कारण कित्येक दिवसांनी त्याला मनुष्याचे मांस मिळणार होते. तो तडक पांडव जिथे झोपले होते तिथे आला. त्याने पाहिले की हिडींबा आपले रूप पालटुन सुंदर स्त्री वेशात भीमासमोर नजर झुकवून उभी होती. याचा त्याला खूप क्रोध आला, " हिडिंबे, मी तुला यांना आणायला सांगितले होते, तर तुच यांच्याजवळ रक्षणासाठी बसलेस, तुला तर मी नंतर पाहेंन प्रथम यांचा समाचार घेतो असे म्हणुन तो भीमाच्या अंगावर धावत गेला. भीमसेन तयारच होते, भीमाने विचार केला की हे श्रमाने थकून आत्ताच विश्राम करत आहेत यांची निद्रा का मोडावी, का बरे त्यांच्या निद्रेत बाधा आणावी, बंधु आणि माता हे निद्रेतून जागे होऊ नये म्हणून भीम स्व:ताच पुढे जाऊ लागला. दोघेही मोठमोठ्याने गर्जना करून एकमेकांना आव्हान दिले. दोन मद मस्त हत्ती जेव्हा एकमेकांना भिडतात त्याप्रमाणे हे दोन विशालकाय देहाचे भीम आणि हिडिंब राक्षस एकमेकांना भिडले. प्रथम बाहू युध्द सुरु झाले, कधी भीम त्यांना मागे रेटत तर कधी हिडिंब भीमाला मागे रेटत, बऱ्याच वेळानंतर त्यांनी उंच, आणि मोठ - मोठाले वृक्ष उपटून एकमेकांच्या देहाकडे फेकू लागले. हे असले भयंकर आवाजाने कुंती सहित इतर पांडव उठले त्यांना काही कळेचना तेव्हा तेथिल हिडिंबेने सर्व हकीकत सांगितली. ती म्हणाली " हे माता आपण सुध्दा एक स्त्री आहेत, मी माझे मन आपल्या पुत्राच्या चरणांवर वाहिले आहे. मी मनोमनी त्यांना वरले आहे तेव्हा आपणच काय तो निर्णय करा." तेव्हा अर्जुन, भीम -हिडिंब युध्द करत होते तेथे पोहचला आणि तो भीमाला म्हणाला " भीमदादा, याच्याशी अधिक समय युध्द करत बसू नको, आपल्याला पुढे आणखी जायचे आहे, आणि रात्र समयी या राक्षसांची शक्ती अधिक वाढते होते, तेव्हा त्वरित याचा वध करून टाक. " असे म्हणताच भीमाने लढवत ठेवलेल्या हिडिंबला म्हणाला " आता तुझ्या पापाचा घडा भरला आहे मृत्यूस तयार हो " असे म्हणून भीमाने त्याला सरळ पूर्णपणे उचलून जवळच असलेल्या मोट्या पाषाणावर आदळले हा भीमाचा महाभयानक आघात तो राक्षस सहन करू शकला नाही तेव्हा तो तिथेच गतप्राण झाला .
To be continued...