पांडू वनामध्ये आपल्या शरीरास आलेला थकवा दूर करण्यासाठी आनंदाने विहार करू लागला, मृगया करणे, फळे गोळा करणे, फुले गोळा करणे, आपल्या राण्याबरोबर आनंदाने विहार करणे, अशा प्रकारे दिवस जात होते.
ऋषी हत्येचे पातक
काही दिवसांनी मृगया साठी पांडू तयार झाला, पाठीवर बाणाने भरलेला भाता, हातात धनुष्य घेतलेले पांडू मनुष्यात इंद्रासमान वाटत होते तेव्हा अचानक त्यांच्या राहुट्याच्या जवळूनच एका काळवीट पळत जाताना पहिले आणि त्याला पाहूनच माद्री म्हणाली " आर्य मला हे मृग आवडले आहे ते मला द्याल, का ?" असे म्हंटल्या बरोबर त्या मृगाची शिकार करण्या करीत पांडू धनुष्याला बाण लावत म्हणाला " आत्ताच मी त्याची शिकार करतो." म्हणून त्या मृगाच्या मागे धावत धावत त्यांच्या ठिकाणापासून खुपच दूर गेला, वनातील झाडीवेळींमुळे मृग कोणत्या दिशेला गेला हे कळत नव्हते, तो थांबला पुढचे काहीही दिसत नव्हते तेव्हा पांडूने भात्यातील पाच बाण काढून धनुष्यावर चढविले, काही अंतरावरच पालापाचोळ्याचा आवाज ऐकू येत होता, आवाजाच्या दिशेने ते बाण शब्दवेधीत्व साधत धनुष्यातून सोडले, लक्ष्यावर अचूक लागले, आणि अचानक मनुष्याच्या वाणी प्रमाणे आवाज ऐकू आला आ SSS... मेलो... मेलो... पांडूच्या काळजात एकदम चर्रर्र झाले, तो पळतच, वनात वाट काढत त्या मृगजवळ जाताच एकदम धक्काच बसला, कारण त्याने जे पाच बाण आवाजाच्या दिशेने सोडले होते ते कोणत्या मृगाला लागणे नाही तर एका सिद्ध मुनी ( ऋषी ) पती - पत्नीच्या शरीरात घुसले होते त्यामुळे ते दोघेही रक्ताने घायाळ झाले होते.
पांडुस शाप
पांडू त्यांच्या जवळ जावून म्हणतो " हे ऋषिवर्य मला माफ करा मला आपल्याला मारायचे नव्हते मी तर मृगया साठी आलो होतो, आपण मला क्षमा करावे " किंदम ऋषी बोलले " हे दुष्ट राजन कोण आहेस तु ? मी ऋषी किंदम, आपल्या पत्नी समवेत या वनात विहार करतो, आज मी मृग रूपात माझ्या पत्नी समवेत मृग रूपाने समागम करत होतो, पण तु आम्हा दोघांनाही मृत्यूच्या दाढेत टाकलास,काय बिघडवले होते तुझे ? पांडू म्हणाला " मी कुरु सम्राट विचित्रवीर्य पुत्र पांडू, माझ्या कडून न कळत चुक झाली मला माफ करा ऋषिवर्य," ऋषी किंदम म्हणाले " हे राजन क्षत्रिय सुद्धा शत्रू संकटात असताना वार करत नाही पण तु तर न पाहताच आमच्यावर वार केलास, आम्ही मृग रूपात समागम करतानाच मारलेस म्हणून तुला ब्रम्ह हत्येचे पातक नाही लागणार पण याचा परिणाम तुला भोगावे लागणार, मी तुला शाप देतो की, " ज्या प्रमाणे आम्ही समागम करत असताना तू आमच्यावर निष्ठुरपणे वार केलास तेव्हा तू पण आपल्या पत्नींबरोबर समागम करतानाचे मरण पावशील." असा शाप देऊन ऋषी किंदम पति - पत्नी दोघेही मरण पावले.
ज्या प्रमाणे आम्ही समागम करत असताना तू आमच्यावर निष्ठुरपणे वार केलास तेव्हा तू पण आपल्या पत्नींबरोबर समागम करतानाचे मरण पावशील. - ऋषी किंदम
पांडूचा वानप्रस्थाश्रम स्वीकार
या घटनेने पांडुवर विलक्षण परिणाम झाला, दुःखाचा डोंगर कोसळला, तेव्हा पांडूने झालेल्या प्रकाराला सर्वस्वी मीच जबाबदार मानून आपल्या दोन्ही राण्यांना हस्तिनापूर राज्याकडे जाण्याचा सल्ला दिला पांडू म्हणाला " मला मिळालेल्या शापाने मी हस्तिनापुरात येऊ शकत नाही, एक कामातुर पती - पत्नीचा वध मी केला आहे, जे ब्रम्ह हत्ये सामान आहे, त्याचे प्रायश्चित मी वनात एकटाच राहून करणार आहे तरी कुंती, माद्री तुम्ही दोघे हस्तिनापूरकडे जाऊन भीष्म तातश्री यांच्या आश्रयात राहावे " पण त्या दोघीनींही हस्तिनापूरकडे न जाण्याचा निर्णय घेतला, " हे आर्य आपणच आमचा त्याग केला तर आम्हांस इथेच प्राण त्यागून यमलोकी जावे लागेल आणि आम्हांला सोबत घेऊन जाणार असाल तर संन्यास आश्रम स्वीकार करण्याची कांहीं एक आवश्यकता नाही आपण तिघे ही वनप्रस्थाश्रम स्वीकारू." पांडू म्हणाला " हा तुमचा अंतिम निर्णय असेल तर मी संन्यास न पत्कारता तुमच्या समवेत वनप्रस्थाश्रम स्वीकारेन." मग ते तिघेही आपले वस्त्रे, अलंकार, मौल्यवान दागदागिने इत्यादींचे त्याग करून स्वताः तपस्वीचा वेष धारण करून हिमालयातील शतशृंग पर्वतावर जाऊन तप साधना करण्याचा निर्णय त्यांनी घेतला.
शतशृंग पर्वतावर तप साधना
अशाप्रकारे पांडू आपल्या दोन्ही पत्नी समवेत हिमालय पर्वतावर आराधना करताना, फळे - कंदमुळे खात, आणि त्यांचा प्रवास प्रथम ते नागशत पर्वतावर गेले, तेथे काही काळ राहून चैत्ररथ नावाच्या घनदाट वनातून वाट काढत काळकूट व हिमालय पर्वताला ओलांडून गंधमादन पर्वतावर गेले, तेथून इंद्रधुम्न सरोवर येथे राहून, हंसकुटला ओलांडून शतशृंग पर्वतावर पोहचले, तेथे ते संपूर्ण तपस्वीच्या वेशात आनंदाने राहू लागले.
शतशृंग पर्वतावर पांडूसहित कुंती व माद्री आल्या पासून तेथील सर्व ऋषी - मुनी, साधू लोकांचे मनोभावे त्यांनी त्यांची सेवा केली. ते पण पांडुस आपल्या पुत्राप्रमाणे प्रेम देत असत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा