दुर्योधनाचा अश्वत्थामास प्रश्न
कौरव, पांडव आणि इतर शिष्य गण आपआपल्या परीने आश्रमात विद्या ग्रहण करीत होते. आश्रमात असताना त्यांना कोणतेही पडेल ते काम त्यांना करावे लागत असे, गुरुकुलाची साफ सफाई करणे, यज्ञासाठी यज्ञ सामुग्री गोळा करणे, गाई राखणे, जल भरणे, सुकलेल्या लाकडे गोळा करणे इत्यादी कामे शिष्यानाच करावे लागत असे, एके दिवशी दुर्योधन, दुःशासन आणि अश्वत्थामा यांना जंगलामध्ये गाई राखण्यासाठी गेले असता दुर्योधन अश्वत्थामाला म्हणाला " हे गुरुपुत्र अश्वत्थामा अर्जुन आपल्या सर्वांना डोईजड होत चालला आहे, त्याचे धनुर्विद्येतील आवड पाहून आचार्यांनी त्याला गाई राखण्याच्या कामापासून मुभा दिली आहे, आणि तू तर गुरुपुत्र आहेस मग तुझ्या बरोबर का अन्याय होतोय ?" गुरुपुत्र अश्वत्थामा तिथे काही नाही बोलू शकला पण त्याच्या मनात एक वेगळीच चलबिचल निर्माण झाली. दुर्योधनाला माहित झाले की आपण सोडलेला शब्द बाण अश्वत्थामाच्या बरोबर वर्मावर लागला आहे.
नंतर थोड्यावेळाने दुर्योधन अर्जुनाचा विषय टाळत अश्वत्थामाला म्हणाला, " गुरुपुत्र अश्वत्थामा आचार्यांनी कोठे बरे विद्या ग्रहण केली होती तुला माहिती आहे का ?" अश्वत्थामा म्हणाला " हो माहित आहे मला, पिताश्री एकदा जमदग्नी पुत्र परशुराम यांच्या कडून हि धनुर्विद्या आणि अस्त्राचे ज्ञान प्राप्त केले आहे. मी जन्मलो तेव्हा माझे पिताश्रीनी ऐकले होते की परशुराम यांनी संपूर्ण पृथ्वी नि:क्षत्रिय करून टाकली होती तिच आता त्यांनी सर्व ब्राम्हणास दान करायची ठरवली आहे. हे ऐकताच पिताश्री सरळ महेंद्र पर्वतावर जमदग्नी पुत्र परशुराम यांचे दर्शन घेतले व आपली ओळख सांगितली " हे क्षत्रिय संहारक परशुराम माझा जन्म अंगिरस कुळातील आहे. महर्षी भरद्वाज यांचा मी पुत्र द्रोण आहे, आणि मी आपल्याकडे न संपणाऱ्या धनाच्या अपेक्षेने आलो आहे." तेव्हा परशुराम म्हणाले " हे भरद्वाज पुत्र, आपले स्वागत आहे, तुला येण्यास थोडा विलंब झाला आहे, या आगोदर मी संपूर्ण पृथ्वी महर्षी कश्यपाला दान केली, माझ्या जवळील, गाई, सुवर्ण, व इतर रत्न ब्राम्हणाला दान केली आहे, आता फक्त माझे शरीर आणि माझ्याकडील अस्त्र विद्या ही फक्त बाकी आहे यातील काय हवे आहे." तेव्हा पिताश्री यांनी न संपणारे धन म्हणजेच महर्षी परशुराम यांच्याकडील अस्त्र विद्या ही विधिपूर्वक, प्रयोग, रहस्य आणि संहार हे सर्व विधी ग्रहण केली. या बरोबरच अग्नी पुत्र, अग्निवेश मुनि यांच्या कडून महान 'आग्नेय' हे भयंकर अस्त्र ही त्यांनी ग्रहण केले. सूर्य मावळतीकडे जात होता तेव्हा दुर्योधन, अश्वत्थामा व इतरही सर्वजण गो - पालन करून आश्रमाकडे परतु लागले.
पण अश्वत्थामाला दुर्योधनाने विचारलेल्या त्या प्रश्नाने मनात घर करून ठेवले होते आणि तो प्रश्न पिताश्रीना केव्हा विचारू असे झाले होते, अश्वत्थामा गुरुकुलापर्यंत त्याचाच विचार करत होता.
अश्वत्थामाचा हट्ट
गुरुकुलात असताना अश्वत्थामाच्या हट्टामुळे द्रोणांना विविध प्रकारचे चालवण्याची अस्त्र विदया पुत्रास देण्याचे कबुल केले. पण सर्व कुमारांसमोर शिकविणे कठीण होईल म्हणुन त्यांनी एक युक्ति केली अश्वत्थामाला मोठया मुखाचे पात्र दिले व सर्व कुमारांना छोट्या मुखाचे जलपात्र देऊन गंगेमधून जल आणावयास सांगितले आणि यामुळे अश्वत्थामा सर्वांपेक्षा लवकर येई तेवढया कालावधीत ते अश्वत्थामास महान अस्त्र विदया देत, खुप दिवस झाले या घटनेचे अर्जुनास शंका आली तेव्हा एके दिवशी सर्व कुमार नदीपात्राकडे गेले असताना अर्जुनाने वरुणास्त्राचा प्रयोग करून तेथेच जलपात्र भरून गुरु समोर ठेवला त्यामुळे गुरु द्रोणाचार्यानी अर्जुनाच्या या कृतीने खुश होऊन अश्वत्थामा बरोबरच अर्जुनाला पण विविध प्रकारचे महान अस्त्र प्रदान केले.
शिष्याची परीक्षा
या कारणानेच अश्वत्थामा आणि अर्जुन या दोघांनाच विविध प्रकारचे अस्त्रे - शस्त्रे यांचे ज्ञान होते. पण गुरु भक्ती मुळे अर्जुन गुरु द्रोणाचार्यांना अधिक प्रिय वाटे, त्याची धनुर्विद्येतील आवड, चिकाटी, योग्य समयी त्याचा वापर याचा त्यास पुरेपूर ज्ञान होते.
एके दिवशी गुरु द्रोणाचार्य आपल्या शिष्यासहित गंगाकिनारी जल स्नान करण्यासाठी गेले असता, द्रोणाचार्य गंगेमध्ये जाऊन सूर्यदेवास अर्ध्या देत असताना अचानक पाठीमागुन एक मोठी सुसर येऊन त्यांच्या पायाला पकडली द्रोणाचार्य स्वतः समर्थ असताना त्यांनी काठावरील शिष्यांकडे पाहून म्हणले " वाचवा, मला वाचवा. "असे आरोळ्या देऊ लागले तेव्हा इतर शिष्य फक्त पाहत होते, ते त्या सुसरीला पाहूनच घाबरून गेले होते तर अर्जुनाने लगेच आपल्या धनुष्य बाणाच्या साहाय्याने पाच बाण मारून त्या सुसरीला ठार केले, आणि गुरु द्रोणाचार्यांची सुटका केली. तेव्हा द्रोणाचार्यानी गुरुभक्ती, धनुर्विद्या पाहून प्रसन्न होऊन अर्जुनास महान असे 'ब्रम्हशिर' अस्त्र प्रदान केले. द्रोणाचार्य म्हणाले, " हे अस्त्र सर्व अस्त्रांमध्ये महान अस्त्र आहे. याचा प्रयोग, रहस्य आणि संहार मी तुला देत आहे, तू याचा स्वीकार कर." असे म्हणून द्रोणाचार्यानी ते अस्त्र अर्जुनास दिले. या घटनेने अर्जुन गुरूच्या नजरेत अधिकच प्रिय झाला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा