गुरु द्रोणाचार्यांनी रंगभूमी वरील शक्ती प्रदर्शन केल्यानंतर सर्वांच्या शक्ती, बुध्दी आणि बल, यांचा परिचय झाला होता त्यांनी असे ठरवले की मागील बारा वर्षांपासून कुरु कुमार आश्रमात राहून विद्या ग्रहण करून तयार झाले आहे. त्यांचे शिक्षण पूर्ण झाले आहे. आता वेळ आली होती ती गुरुदक्षिणेची.
द्रोणाचार्यांची गुरुदक्षिणा
गुरु द्रोणाचार्यांनी आपल्या सर्व शिष्याना बोलवून सांगितले की " माझ्या प्रिय शिष्यांनो तुमच्या सर्वांचे शिक्षण पूर्ण झाले आहे आता तो समय आला आहे, की शिष्यांनी गुरु इच्छित आपल्या आचार्यांना गुरुदक्षिणा देण्याची." तेव्हा सर्व शिष्य म्हणाले " सांगा आचार्य, आपण सांगाल ती गुरु दक्षिणा आम्ही देऊ आपणास काय हवे आहे सुवर्ण, माणिक, मोती, गायी, भूमी, काय हवे आहे ते आम्ही आपल्याला दक्षिणा स्वरूपात देऊ." आचार्य द्रोण हसून म्हणाले " मला या पैकी काहीही नको आहे, मी जे मागणार आहे ते कोणी एक शिष्यच काय तर तुम्ही संपूर्ण शिष्य मिळून ती ईच्छा पूर्ण करेल की नाही ही शंका आहे मला, माझी एकाच ईच्छा आहे की, पांचाळ नरेश, द्रुपदला युध्दात बंदी करून माझ्या समोर उभे करावे हीच माझी सर्वोत्तम दक्षिणा असेल, कोण पूर्ण करेल माझी ही ईच्छा "
सर्व कुरु कुमार ही अजब गुरु दक्षिणा ऐकून आश्चर्य चकित झाले, कारण पांचाल नरेश द्रुपद काही साधा राजा नव्हता तर हस्तिनापूर सारखेच खूप जुने आणि महापराक्रमी योध्दे या राजघराण्यामध्ये जन्मले होते. हस्तिनापूर सारखेच विशाल आणि सुरक्षित असे राज्य आणि तेवढीच सुरक्षित त्यांची
पांचाल नरेश द्रुपद
त्या राज्याचा राजा महाराज द्रुपद हा महान ऋषी भारद्वाज आणि अग्निवेश यांच्या आश्रमात राहून द्रोणाचार्य सोबत विद्या ग्रहण केली होती. म्हणजेच द्रोणाचार्य यांच्या समान ते योध्दे होते. विविध अस्त्र आणि शस्त्र धारण करणारे द्रुपद यांना जिंकून बंदी करणे खुप अशक्यप्राय होते. गुरु द्रोणाचार्य यांच्या या आगळ्या वेगळ्या दक्षिणेला प्रथम कोणी होकार दिला नाही, पण लगेच अर्जुन आपल्या हातातील धनुष्य आकाशात उंचावून म्हणाला " आचार्य मी त्या पांचाळधिश द्रुपद यास बंदी करून आपल्या चरणांवर टाकेन." गुरु मनातुन आनंदी झाले. अर्जुनाने असे म्हटल्या बरोबर दुर्योधन, दुःशासन, इत्यादी अनेकांनी " मी त्यास बंदी करेन, मी त्यास बंदी करेन, असे मोठमोट्याने कोलाहल करू लागले.
द्रोणाचार्य म्हणाले " पांचाल नरेश द्रुपद बरोबर युध्द करून त्यास बंदी बनवणे एवढे सोप्पे नाहीये, हस्तिनापूर सारखेच ते एक समृध्द राज्य आहे. द्रुपद माझ्या सारखाच शूर, वीर, क्षत्रिय आहे विविध शस्त्र तो चालवू शकतो. धनुर्विद्येत माझ्या एवढीच त्यालाही अस्त्र ज्ञात आहेत. उत्तरेस हिमालयापासुन दक्षिणेस चर्मण्वती नदी पर्यंत, पूर्वेला कुरु, मत्स्य, शूरसेन हे राज्य आणि पश्चिमेला नैमिषारण्य अशा या विस्तृत भूमीवर पांचाल राज्य आहे. 'कंपिल्यनगर' ही पांचाल राज्याची राजधानी, द्रुपद याची सैन्य संख्या दोन अक्षौहिणी सेना आहे एक्केवीस हजार, आठशें सत्तर रथ, एक्केवीस हजार, आठशें सत्तर गज, आणि एक लाख, नऊ हजार, तीनशे पन्नास सैनिक, पासष्ठ हजार, सहाशे दहा अश्व, येवढे सैन्य म्हणजे एक अक्षौहिणी या सैन्याच्या दोन पट द्रुपदकडे सैन्यबळ आहेत. या बरोबरच त्याचा सेनापती शिखंडी हा सुध्दा अजेय आहे. सुमित्र, प्रियदर्शन, व्याघ्रदत्त, चित्रकेतू, शत्रूंजय इत्यादी अनेक द्रुपद पुत्रांच्या संरक्षणामध्ये पांचाल नरेश द्रुपद असणार या सर्वांचा पराभव करूनच द्रुपद पर्यंत तुम्ही पोहचु शकता."
विकर्ण म्हणाला " आचार्य आपण हे सांगुन आमचा आत्मविश्वास कमी करताय का ?" द्रोणाचार्य म्हणाले " नाही विकर्ण मी तुमचा आत्मविश्वास नाही कमी करत पण शत्रूचे बल मापन करून प्रहार करणे केव्हाही योग्य ठरेल. तर सर्व शिष्यानो उद्या सूर्योदयासमयीं युध्दासाठी शस्त्र - अस्त्र सहित आपण हस्तिनापूरच्या सीमेवर जाणार आहोत आणि जर कोणाला या भयंकर युध्दाचे भय वाटत असेल तर त्याला मी गुरुदक्षिणेच्या दायित्वातून आत्ताच मुक्त करतो. उद्या प्रातःकाळी आपण चर्मण्वती नदी किनारी आपले शिबीर असणार आहे तिथेच आपण भेटू या ." असे म्हणून द्रोणाचार्य निघून गेले. कौरव आणि पांडव हे रात्री उशिरा पर्यंत उद्याच्या युध्दात पांचाल नरेश द्रुपद यांच्या बरोबर कोण, कसे लढावे याचे नियोजन, युद्धनिती आखत करत होते.
युध्दाची तयारी
दुसऱ्या दिवशी पहाटेच द्रोणाचार्यांचे सर्व शिष्य आपआपल्या शस्त्र - अस्त्रे धारण करून आपल्या विविध पताका आणि अश्वांनी युक्त रथांवर आरूढ होऊन सूर्योदयापूर्वीच चर्मण्वती नदी किनारीला असलेल्या शिबिरात पोहचले, सर्व शिष्य आपआपल्या रथातून उतरून शिबिरासमोर आले, त्या अगोदरच आचार्य द्रोण तिथे आलेले होते. त्यांनी त्या रथांमधून येणाऱ्या शिष्यामध्यें अंगराज कर्ण पण आलेला पाहून कपाळावर आठ्या निर्माण झाल्या, शिष्य जवळ येताच सर्वांनी आचार्यांना प्रणाम केला. द्रोणाचार्य म्हणाले " प्रिय शिष्यांनो, ही जी गुरुदक्षिणा मी मागत आहे ती माझ्या शिष्याकडे मागत आहे. जो माझा शिष्य नाही त्यांनी गुरुदक्षिणा देण्याचा प्रश्नच येत नाही, या सामर्थ्याच्या परीक्षेत भाग घेऊ नये. त्यांनी परत हस्तिनापुरी सन्मानाने जावे आणि मी दिलेल्या विद्येच्या, शिक्षणाच्या बळावर माझे शिष्य गुरुदक्षिणा देण्यास समर्थ आहेत, असें मला वाटते इतर कोणत्या राजाची मदत माझ्या शिष्यांनी घेऊ नये." तेव्हा सर्व जण विजय धनुष्य धारण केलेल्या अंगराज कर्ण यांच्याकडे पाहत होते. अपमान झालेला अंगराज कर्ण कोणाला काहीही न बोलता परत हस्तिनापुराकडे निघून जातो.
द्रोणाचार्य सर्वांना युध्दासाठीच्या सूचना देत होते, द्रोणाचार्य म्हणाले " ही समोर असलेली चर्मण्वती नदी ओलांडली की पांचालचे राज्य सुरु होते. मला फक्त जिवंत द्रुपद माझ्या समोर बंदी झालेला हवा आहे. तुम्ही सर्वांनी आपल्या सामर्थ्याचे परिचय पांचालनरेशला देऊन त्याचा अहंकार नष्ट करा, यशस्वी व्हा, प्रस्थान करा."
to be continued....