रविवार, २० नोव्हेंबर, २०२२

हस्तिनापूरचा गांधारशी कौठुम्बिक संबंध

 

विचित्रवीर्याचा मृत्यु

गंगापुत्र भीष्म आपल्या विचित्रवीर्यासाठी ज्या काशीराज कडुन तीन कन्या हरण करून आणल्या त्यातील अंबालिका आणि अंबिका यांचा विवाह विचित्रवीर्यासोबत थाटात होतो, पण राजकुमार आपल्या अंबालिका आणि अंबिका यांचासोबत फक्त सात वर्षाचं राज्य उपभोगले, आणि ऐन तारुण्यात विचित्रवीर्य यांना यक्ष्मरोगाने पछाडले, त्यातच त्यांचा मृत्यु झाला. आदिपर्व अध्याय (१००-१०१).

भीष्माला सत्यवतीची विनंती

आपले दोन्ही शांतनू पुत्र निपुत्रिक होऊन मृत्यु पावल्याने सत्यवतीस फार दुःख झाले, तेव्हा ती भीष्माला येवून म्हणते," हे भीष्म आपल्या कुरु कुळ फार प्राचीन, अनादी काळापासून चालत आले आहे, तेव्हा तुला हे कुल वाचवायचे असेल, तर तु या काशीराज कन्येबरोबर विवाह करुन या हस्तिनापूर साम्राज्यास वारस द्यावे " भीष्म म्हणाले,माते, मी माझ्या पित्यासाठी ही प्रतिज्ञा केलेली आहे. आणि त्याचे पालन करणे हा माझा प्रथम धर्म आहे.

परित्याजेयं त्रैलोक्यं राज्य देवेषु वा पुनः l

यव्दाप्यधिकमेताभ्यां न तु सत्यं कथचन l l

सर्व पृथ्वीचे राज्य व मृत्यूलोकांतील सर्व सुखे याच्याकरीत तर नाहीच, पण प्रत्यक्ष त्रैलोक्याच्या राज्याकरिता किंवा त्याहूनही अधिक श्रेष्ठ अशा दुसऱ्या कोणत्याही सुखाकरिता मी सत्य (प्रतिज्ञा) सोडणार नाही. असा पितृभक्त, वचनपालक, सत्यनिष्ठ भीष्माचे वचन ऐकून सत्यवती अधिकच दुःखी होते, तेव्हा भीष्म सांगतात की , कुळ जर नष्ट झाले तर तपोनिष्ठ ऋषीकडुन नियोग पध्दतीने पुत्र प्राप्त करून घेता येऊ शकते तेव्हा आपण एका ऋषिवर्यांस आमंत्रित करून पुत्र प्राप्तीचा उपाय करावा. तेव्हा सत्यवती आपल्या जेष्ठ पुत्र महर्षी वेद व्यास यांना आमंत्रण देतात आणि सांगतात,"पुत्र व्यास आमच्या कुलाच्या उत्कर्षासाठी कृपाकरुन नियोग पध्दतीने काशीराज कन्येला पुत्र, अन हस्तिनापूर साम्राज्यास वारस द्यावा, तेव्हा वेद व्यास दोन्ही कन्येशी एक वर्षांचे व्रत करावयास लावतात, तेव्हा अंबिकेस एक पुत्र म्हणजे धृतराष्ट्र, अंबालिकेस एक पुत्र म्हणजे पांडू, आणि दासीपासून विदुर असे तीन पुत्र झाले. व्यास म्हणाले, "अंबिकेचा जो पुत्र होईल तो हुशार, शूर, पराक्रमी, साहसी, शक्तिशाली असेल पण...!" सत्यवती म्हणाली, "पण काय पुत्र ? " व्यास म्हणाले, पण माते, ते जन्मांध असेल. हे ऐकून सर्वजण स्तब्धच राहिले, तेव्हा सत्यवती आपले गळालेले सर्व अवसान एकत्र करून व्यासांना विचारते, " पुत्र मग अंबालिकेचा पुत्र तर चांगला होईल ना ? तो कसा असेल ?" व्यास म्हणाले माते, अंबालिकेचा पुत्र हा धर्मशील, गुणवान, सामर्थ्यवान, श्वेत वर्णाचा होईल, पण या दासी पासुन होणार जो पुत्र आहे तो न्यायी, धर्मपालक, सद्गुणी, आणि हुशार जन्मणार आहे. (आदिपर्व अध्याय १०५ - १०६).

धृतराष्ट्र, पांडू, आणि विदुर या आपल्या सावत्र बंधूंच्या पुत्राचे पालन - पोषण, त्यांचे शिक्षण, विद्या ग्रहण हे सर्व भिष्म स्वतःच जातीयतेने करत होते बंधूंच्या पुत्रांचा आपल्या पुत्राप्रमाणे सांभाळ केला.

राज्यभिषेकाची तयारी

तीनही राजकुमार आता हळूहळू मोठे होऊ लागले, भीष्मांनी आपले राज्य आपल्या पुत्रांच्या हवाली करण्याचे ठरवले, पण सर्वांत मोठा धृतराष्ट्र हा जन्मांध असल्याने तो राजा नाही होऊ शकत, आणि विदुर हा दासी पुत्र असल्याने त्याला पण राजा नाही करता येत, तेव्हा राजकुमार पांडू याचे राज्यभिषेक करण्याचे ठरविले, आणि विदुरास महामंत्री, हे सर्व तयारी करत असताना महर्षी व्यास आपल्या शिष्यगणंसोबत आले असता त्यांनी भीष्मांना सांगिलते की,"प्रथम या तिघांचेही विवाह करून मगच राज्यभिषेक करावा " भीष्म म्हणतात "महर्षी आमच्या धृतराष्ट्रास शोभेल अशी एखादी कन्या आपल्या बघण्यात असल्यास कृपा करून सांगावे", वेद व्यास म्हणाले, "हे भीष्मा, संपूर्ण आर्यावर्तात धृतराष्ट्राकरिता आज माझ्या पाहण्यातील फक्त अन फक्त एकाच कन्या योग्य आहे." भीष्म म्हणतात, "महर्षी अशी कोण कन्या आहे ?, कोणत्या महान राज्यातील आहे ?, कोणते महान घराण्यातील आहे ती कन्या ? नाव काय त्या कन्येचे ?," व्यास म्हणाले, "गांधार राज्याचे राजा सुबल यांची गांधारी नामक कन्या आहे, ती खुप सुंदर, धर्मशील, आणि गुणवान आहे. त्याच बरोबर ती मोठी शिवभक्त सुध्दा आहे, आणि तिला भगवान महादेव यांचा १०० पुत्रांचे वरदान सुध्दा आहे, त्यामुळे कुरु कुळाचे सामर्थ्य, आणि गौरव त्याने अनेक पटीने वाढेल." भीष्म म्हणतात, "एवढे आपण सांगितलेत तेव्हा ते महान राज्याशी आमचे नाते संबंध अधिक दृढ करू, मी उद्याच गांधारला निघण्याची तयारी करतो."

हस्तिनापूर ते गांधार प्रवास

भीष्म आपली संपूर्ण सेना घेऊन कित्येक दिवसांचा प्रवास करून गांधारला जातात. तेथे जाऊन गांधार नगराबाहेर थांबतात, तेव्हा महाराज सुबल यांना वाटले की, आपल्यावर कोणीतरी शत्रु हल्ला करण्याच्या उद्देशाने एवढी भली मोठी सेना घेऊन आला आहे. कुरु सेनेने शांतीचा निशाण दाखवल्यावर, सुबल यांचा जीव भांड्यात पडला. तेव्हा सुबल राजांनी भीष्मांचे जंगी स्वागत करून खुप आदर सत्कार केला. भीष्म हा आदर सत्कार पाहुन खुप खुश झाले. त्यांना त्यांच्या राजदरबारात घेऊन येतात आणि आदरपूर्वक विचारतात," हे महाबाहो, भीष्म आपण माझ्या छोट्या गांधारमध्ये येण्याचे काय कारण असावे ? का म्हणुन आपण एवढ्या दूर प्रवास केलात.?" भीष्म म्हणाले, हे गांधारराज सुबल मी येवढ्या दुरून हस्तिनापूर ते गांधारपर्यंत आपल्याकडे एक दान मागायला आलो आहे." सुबल म्हणतात, "दान...?, हे कुरुश्रेष्ठ, एक छोटे गांधार संपन्न हस्तिनापूर कुरु साम्राज्याला काय दान देणार ?, भीष्म म्हणाले,"महाराज सुबल मी आपल्याकडे एका कन्येचे दान मागण्यासाठी आलो आहे, तरी आपण आम्हांस निराश करणार नाही ही अशा आहे." गांधार नरेशना धक्काच बसला मनात असे वाटू लागले की भीष्म एवढे वयोवृध्द असुन आपल्या गांधारीचा हात मागण्यासाठी आपल्या गांधारला आले असावे पण सुबल भीत म्हणतात, "महामहिम भीष्म आपण तर आजन्म ब्रहमचर्याची प्रतिज्ञा केली आहे ना ?". तेव्हा भीष्म मोठमोठ्याने हसतात आणि म्हणतात " "गांधारराज आपली काय तर चुकभुल होत आहे, मी माझ्यासाठी नाहीतर कुरु राजकुमारसाठी आपल्या कन्येला मागतोय." तेव्हा सर्वांना हसु आले, महाराज सुबल म्हणतात, "तर आमची काही एक अडचण नाही, कुरु राजकुमार पांडू यांच्यासाठी आम्ही आपल्या सोबत संबंध जोडण्यास तयार आहोत."

भीष्म म्हणतात " पांडू नाही, धृतराष्ट्र...! कारण पांडू अनुज आहे, प्रथम विवाह जेष्ठ धृतराष्ट्राचा मग पांडूचा." या वाक्याने संपूर्ण दरबारात भयाण शांतता पसरते, हे पहा सुबल महाराज आपले मैत्रीपूर्ण संबंध आहेच पण ते नात्याच्या बंधात अधिक दृढ करता यावेत, त्याच बरोबर हस्तिनापूर सोबत आपले संबंध पाहून आपल्या राज्याकडे कोणी वाईट दृष्टी सुध्दा कोणी नाही टाकणार म्हणुन मी आपल्या कन्येचा हात मागत आहे." या व्दिधा मन:स्थितीत महाराज सुबल अत्यंत चिंतातुर होऊन गेले कारण त्यांना माहित होते की कुमार धृतराष्ट्र जन्मांध आहेत, व त्यांनी १ दिवसांचा वेळ मागितला, राजा सुबल आपली राणी सुदर्भा सोबत असताना विचारविमर्श करत होते, "संदर्भा एक राजा म्हणुन मी आपल्या कन्येला कुमार धृतराष्ट्र याला देईन पण एक कन्येचा पिता म्हणून मला हा अन्याय वाटतोय. मी काय करू हे मला कळत नाहीय." सुदर्भा म्हणते, "स्वामी हस्तिनापूर सोबत आपण शत्रुत्व घेणे, म्हणजे आपल्या पायावर आपणच कुऱ्हाड चालवण्यासारखे आहे, आणि आपल्या गांधार जनतेचा पण विचार करा ते पण आपल्या पुत्राप्रमाणे आहेत."

दुसया दिवशी "आम्ही गांधारीचे विवाह कुमार धृतराष्ट्र यांच्यासोबत करण्यास तयार आहोत "असा संदेश भीष्मांना कळवतात, तेव्हा भीष्म आपल्या हस्तिनापूरला आनंदाने परत निघतात. गांधारहून भीष्म हस्तिनापूरला आले तेथे सर्वानी त्यांचे जंगी स्वागत केले, भीष्म सरळ माता सत्यवती यांच्या कक्षात जाऊन ही गोड बातमी कळवतात, सत्यवती म्हणते," पुत्र भीष्म, नववधू गांधारीला नाही आणलास?" मी निघताना गांधारराज यांनी विनंती केली की, आम्ही स्वतःहून गांधारीला घेऊन येऊ, आपण पुढे चालावे." सत्यवती म्हणते,"ठीक आहे." तेव्हा साऱ्या आर्यावर्तात ही बातमी जाते की, हस्तिनापूर राजकुमार धृतराष्ट्र यांचा विवाह गांधार कुमारी गांधारी हिच्या बरोबर ठरलेला आहे.

to be continued...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

हिडिंब राक्षस वध

   गंगाकिनारच्या वनांत प्रवेश  पांडव आपली माता कुंती सहित गंगापार करून नक्षत्रांच्या आधारे दक्षिण दिशेने चालत घनघोर अरण्यात निघाले. पांडव आ...