महाभारत एक महाकाव्य असताना त्यामध्ये अनेक कथा, पात्रे अनेकविध भावनांचे आंदोलने आहेत. आज पासुन आपण महाभारत कथासार सुरुवात करत आहोत आज आपण कौरव पांडवांच्या पूर्वजांचा इतिहास, म्हणजे ते कोण होते ते भुतलावर कसे आले याविषयी आपण पाहू,
कौरव पांडवांच्या पूर्वजांचा इतिहास
महाभिष आणि गंगा यांना शाप :-
इक्ष्वाकु वंशामध्ये एक महाभिष नावाचा पुण्यवान राजा होऊन गेला, त्याने अनेक यज्ञ, दान करून स्वर्गामध्ये स्थान प्राप्त केले होते, एक वेळेस ब्रम्हदेवासमोर सर्व ब्रम्हर्षी, राजर्षी,तपस्वी,देवादिक सर्व पुण्यात्मे जमले होते तेव्हा ब्रहमदेवांचे दर्शनासाठी पवित्र गंगा ही आली,आणि तिने ब्रम्हदेवास नमस्कार केला तेव्हा वायुच्या झोताने तिचे श्वेत वस्त्र उडुन गेले तेव्हा सर्व दरबारातील पुण्यात्मेनी आपली माने शरमेने खाली घातली,पण महाभिष राजा एक टक गंगेकडे पाहतच राहिला.
हा सर्व प्रकार ब्रम्हदेवाच्या लक्षात आला आणि त्यांनी महाभिषला शाप दिला कि," तु पृथ्वीवर जन्म घेशील, तेथे हि गंगा तुला न आवडणारे कृत्य करून तुला दुःख देईल आणि तु काहीही करू शकणार नाही ."
अष्टवसुची कथा :-
पुढे गंगा पृथ्वीवर जात असताना तिला वाटेत अष्टवसु भेटले, त्यांनी गंगेला विनंती केली की, माते !आम्हाला तु शाप मुक्त कर, तर गंगेने कारण विचारले असता, ते सांगू लागले की, आम्ही आठ वसु उन्मत्त होऊन महर्षी वशिष्ठ यांची कामधेनु नंदिनी गाय पळवण्याचा प्रयत्न केला म्हणुन आम्हाला मृत्युलोकीं जन्म घ्यावा लागणार आहे हा शाप मिळाला आहे, आम्ही क्षमा, याचना केल्यामुळे आम्हांस एक वर्षभराच्या आत आम्ही शापमुक्त होऊ हा उ:शाप दिला पण आमच्यातील ध्यु नामक वसुने ती गाय आणल्याने त्यास पुष्कळ वर्ष भूतलावर घालवावा लागणार आहे,तेव्हा माते आम्हांस कृपा करून जन्म घेतल्यावर तुझ्या पवित्र जलात बुडवून आम्हाला या घोर शापातून मुक्त कर. मग गंगेने त्यांची विनंती मान्य केली. (आदिपर्व अध्याय ९६).
धर्मशील प्रतिप राजा :-
ययाति, पुरु, भरत, दुष्यन्त, कुरु अशा या कुरु कुळामध्ये महान राजा प्रतीप यांचा जन्म झाला. हा प्रतीप राजा एके दिवशी गंगाकिनारी तप करत असताना नदीच्या प्रवाहातून एक शुभ्र वस्त्रधारी, देवकन्या, वा अप्सरा असावी अशी सुंदरी स्त्री येऊन उजव्या मांडीवर येऊन बसली, राजाने विचारले असता तिने सांगितले कि, मी देवकन्या, गंगा आहे, माझे मन आपल्यापायी मी वाहिले आहे,आपण माझा स्विकार करावा. तेव्हा महान, धर्मशील राजा प्रतीप म्हणाले, हे देवी, पुरुषाची डावी मांडी ही भार्येची असुन उजवी मांडी मुलामुलींची किंवा सुनांचे स्थान असते. तु स्वतःहून माझ्या उजव्या मांडीवर बसली आहे, म्हणजे मी तुझी भार्या म्हणून स्वीकार करू शकत नाही, पण तुला मान्य असेल तर मी तुला माझी सून म्हणून स्वीकार करेन.ही अट मान्य करून गंगा आपल्या प्रवाहात लुप्त झाली.
शांतनुचा जन्म :-
पुढे काही वर्षांनी प्रतीप याना ३ पुत्र प्राप्त झाले १) शंतनू २) देवपी ३) बाल्हिक
शंतनू हा जेष्ठ असल्याने तो कुरु साम्राज्याचा राजा झाला, देवपी हा सर्व राज्यकारभार यात न रमत वानप्रस्थाश्रम स्वीकार करून ईश्वर शोधात निघुन गेले, बाल्हिक हा बाल्हिक देशाचा राजा झाला. हा शंतनू म्हणजे मागील जन्मी महाभिष राजा होय, राजा प्रतीप यांनी शंतनूला सांगिलते की, तू जेव्हा मोठा होशील तेव्हा एक सुंदर स्त्री तुझ्याकडे येईल, तेव्हा तु कोण ? कोठुन आलीस ? वगैरे काहीही विचारू नकोस ,माझ्या आज्ञेने तू तिचा भार्या समजुन स्वीकार कर,तिने कोणतेही कृत्य केले तरी तु तिला असे का केलीस असे विचारू नको. अशी विचित्र अट घालुन राजा प्रतीप आपले राज्य शंतनूच्या हाती सोपवून आपल्या भार्येसोबत वनात निघुन गेले.
शांतनु व गंगा यांचे मिलन :-
एके दिवशी राजा शंतनू गंगाकिनारी भ्रमण करीत असताना त्याला एक सुंदर, श्वेतवर्णी, श्वेत वस्त्रधारी, कमनीय बांधाची लावण्यवती दिसली, त्याने तिला माझी भार्या होशील ? असे विचारले असता हो पण तुम्ही मला माझ्या कोणत्याही कार्यात कधीही अडथळा करायचे नाही, माझे वर्तन आवडो, या नावडो, कधीही अप्रिय भाषण करून मला दुःखी करू नये, नाहीतर मी तेव्हाच तुम्हला सोडून जाईन, अशी अट गंगानी घातली, तेव्हा आपल्या पिताच्या वाचनाची आठवण झाली. अशी अट मान्य करून शंतनू आपल्या राजधानीस निघुन गेला.
पुढे महाराज शंतनू आणि गंगा यांचा विवाह पार पडला, आणि काही दिवसांनी त्यांना पुत्ररत्न प्राप्त झाले,दुसऱ्याच दिवशी गंगा त्या बालकाला घेऊन नदीमध्ये बुडवुन टाकी,अशा प्रकारे गंगेच्या वागण्याचा शंतनूला खूप राग येई पण तो आपल्या पिता, आणि पत्नीला दिलेल्या वाचनामुळे, आणि गंगा आपल्याला सोडुन जाईल या भीतीने तो काहीही बोलत नसे, या नंतर गंगेने एकापाठोपाठ सात पुत्र नदीत बुडवुन मारले, शंतनूच्या सहनशक्तीचा अंत झाला आणि आता काहीही होवो पण आज मी विचारेन म्हणुन, गंगेला आठव्या पुत्राला घेऊन नदीत बुडवणार इतक्यात शंतनूने त्या मुलाचे प्राण वाचवले, आणि म्हणाला की हे दुष्टे ! अजुन किती पाप करणार आहेस, तुला या कोवळ्या जीवाची दया येत नाही का ? तेव्हा गंगेने शंतनूला पूर्वजन्मीची कथा, आणि अष्ठवसु याना मिळालेला शाप यांची कथा सांगितली, या आठव्या पुत्रास न मारण्याचे वचन देऊन गंगा पुत्र सोबत निघुन गेली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा