रविवार, १८ डिसेंबर, २०२२

शंभर कौरवांचा जन्म

 

व्यास ऋषीद्वारे गर्भाची पुनर्स्थापना

शतशृंग पर्वताच्या वनामध्ये कुंती दुसऱ्या वेळेस गर्भवती आहे हे समजल्यावर मात्र गांधारीला फार दुःख झाले, उद्विग्न मनाने ती रडू लागली, आक्रोश करू लागली, या दुःखाच्या भरात तिने आपल्या गर्भावर आघात करू लागली, मारण्यास सुरवात केली, जोरदार आघाताने गांधारीला असहनीय वेदना होऊ लागल्याने ती मूर्च्छित होऊन पडली, जेव्हा जाग आली तेव्हा तिला समजले की, आपल्या गर्भाची प्रसव जोरदार आघाताने झाली आहे पण मांसरुपी गोळाचा गर्भातुन जन्म झाला आहे हे समजताच तीला हा धक्का सहन झाला नाही गांधारी परत मूर्च्छित झाली. तेव्हा तिथे महर्षी व्यास मुनी प्रकट झाले आणि त्यांनी त्या मांसरुपी गोळ्यावर आपल्या कमंडलूतील जल अभिमंत्रित करून त्याचे एकशे एक हाताच्या पेरा एवढे आपोआप तुकडे झाले, आणि भीष्मास सांगुन एकशे एक तुपाने (धृताने) भरलेले कुंभ मागविले, त्यामध्ये ते मांसाचे एक - एक करून सर्व तुकडे, एक - एका कुंभात ठेवुन, विविध प्रकारचे आयुर्वेदिक औषधी वनस्पती त्या कुंभात टाकुन त्याला अभिमंत्रित जलाने सिंचले. माता सत्यवती, भीष्म, अंबिका, अंबालिका, धृतराष्ट्र, विदुर या सर्वांना त्यांनी सूचना केली की या कुंभाना अतिशय गुप्त पद्धतीने, सुरक्षित जागी ठेवुन त्याची काटेकोर पध्दतीने सुरक्षा करावी असे सांगुन व्यास मुनी हिमालयाकडे निघुन गेले.

शंभर कौरवांचा जन्म

कालांतराने त्या कुंभातुन पहिला पुत्र जन्मा आला, पण तो जन्माला तेव्हा गर्दभ ( गाढव ) सारखा रडू लागला , त्या आवाजाने दुसरे गर्दभ ही ओरडू लागले, सर्वत्र अंधार झाला, जोरजोराने वारा वाहू लागला, गिधाड, कावळे, घुबड असे सर्व अशुभ पशु पक्षी विचित्र आवाज करू लागली, तेव्हा राजमाता सत्यवती, महामंत्री विदुर, पितामह भीष्म हे कुलगुरू कृपाचार्य यांना भेटुन विचारतात " कुलगुरू, अशी कोणती आपत्ती येणार आहे ज्यामुळे हस्तिनापूर राज्यात अशी अशुभ चिन्हे का जाणवत आहेत ?"

कुलगुरू कृपाचार्य म्हणतात, " राजमाता, ज्या प्रमाणे सर्व पशु - पक्षी - प्राण्यांना प्रकृतीचे बदल, हलचाल अगोदरच माहीत होते त्या प्रकारेच हस्तिनापुरात दुष्ट शक्ती, आसुरी वृत्तीचा जन्म झाला आहे तेव्हा असे अशुभ चिन्हे जाणवु लागलेत." राजमाता सत्यवती म्हणतात " कोणती दुष्ट शक्ती, आणि कोणाच्या रूपात ?" कुलगुरू म्हणतात " राजमाता आजच आपल्या राजपरिवारात धृतराष्ट्र पुत्रचा कुंभातुन जन्म झाला आहे. त्याचा त्याग करावा, अन्यथा तो संपूर्ण कुळाचा संहार करेल." ही गोष्ट धृतराष्ट्र याला पटली नाही, पुत्र मोहामुळे तो त्या पुत्राचा त्याग करू शकला नाही. अशा प्रकारे एका पाठोपाठ एका मासातच गांधारीच्या सर्व पुत्रांचा जन्म झाला.

शंभर कौरवांची नावे 

ते सर्व पुत्र, त्यांची नावे जेष्ठतेनुसार पुढील प्रमाणे,

१) दुर्योधन, २) दुःशासन, ३) दु:शल, ४) दुःसह, ५) सह, ६) जलसंध, ७) सम, ८) दुर्धर्ष, ९) विन्‍द, १०) अनुविन्द, ११) विवित्सु, १२) सुवाहु, १३) दुष्प्रधर्षण, १४) दुर्मर्षण, १५) दुर्मुख, १६) दुष्कर्ण, १७) कर्ण, १८) विविंशति, १९) विकर्ण, २०) शल, २१) सत्त्‍व, २२) सुलोचन, २३) चित्र, २४) उपचित्र, २५) चित्राक्ष, २६) चारू चित्रशरासन (चित्र-चाप), २७) दुर्मद, २८) दुर्विगाह, २९) विवित्सु, ३०) विकटानन (विकट), ३१) ऊर्णनाभ, ३२) सुनाभ (पद्यनाभ), ३३) नन्द, ३४) उपनन्‍द ३५) चित्रबाण (चित्रवाहु ), ३६) चित्रवर्मा, ३७) सुवर्मा, ३८) दुर्विरोचन, ३९) अयोबाहु, ४०) महाबाहु चित्रांग (चित्रांगद), ४१) चित्रकुण्‍डल (सुकुण्डल) ४२) भीमवेग, ४३) भीमबल, ४४) बलाकी, ४५) बलवर्धन, ४६) उग्रायुध, ४७) सुषेण, ४८) कुण्डोदर, ४९) महोदर, ५०) चित्रायुध (दृढ़ायुध), ५१) निषंगी, ५२) पाशी,५३) वृन्‍दारक, ५४) दृढ़वर्मा, ५५) दृढक्षत्र, ५६) सोमकीर्ति, ५७) अनूदर, ५८) दृढ़संघ, ५९) जरासंध, ६०) सत्यसंध, ६१) सद:सुवाक, (सहस्त्रवाक) ६२) उग्रश्रवा, ६३) उग्रसेन, ६४) सेनानी (सेनापति), ६५) पुष्‍पराजय, ६६) अपराजित, ६७) पण्डितक, ६८) विशालाक्ष, ६९) दुराधर (दुराधन), ७०) दृढहस्थ, ७१) सुहस्‍त, ७२) वातवेग, ७३) सुवर्चा, ७४) आदित्यकेतु, ७५) बहाशी, ७६) नागदत्त, ७७) अग्रयायी (अनुयायी), ७८) कबची, ७९) क्रथन, ८०) दण्डी, ८१) दण्डधार, ८२) धर्नुग्रह, ८३) उग्र, ८४) भीमरथ, ८५) वीरबाहु, ८६) अलोलोप, ८७) अभय, ८८) रौद्रकर्मा, ८९) दृढ़रथाश्रय (दृढरथ), ९०) अनाधृष्य, ९१) कुण्डभेदी, ९२) विरावी, ९३) प्रमथ, ९४) प्रमाथी, ९५) वीर्यमान् दीर्घरोमा (दीर्घलोचन), ९६) दीर्घबाहु, ९७) महाबाहु व्यूढोरू, ९८) कनकध्‍वज (कनकागंद), ९९) कुण्‍डाशी (कुण्डज), १००) विरजा. व शंभर पुत्रानंतर जन्मलेली एक कन्या तिचे नाव दु:शाला असे ठेवले, आणि या बरोबरच धृतराष्ट्राला वैश्य जातीच्या स्त्री पासुन ( सुखदा - नावाची गांधारीची दासी ) आणखीन एक पुत्र होता त्याचे नाव युयुत्सु असे होते, तो धर्मशील, आज्ञाकारी होता, अशा प्रकारे सर्व शंभर कौरवांचा जन्म झाला.   (आदिपर्व अध्याय ११६ श्लोक १- १८).

 

इकडे वनामध्ये युधिष्ठीर एक वर्षांचा झाला, तेव्हा पांडुस असे वाटू लागले की, युधिष्ठीर जर हस्तिनापूर सम्राट झाला तर त्याच्या रक्षणाची जबाबदारी तो एकटा कसे पाडणार, कुंतीला पांडूने विनंती केली की, युधिष्ठिराच्या रक्षणासाठी एक बलिष्ठ, शक्तिशाली, असा पुत्र हवा, जो हस्तिनापूरच्या रक्षणाची जबाबदारी समर्थपणे पार पाडेल. तेव्हा कुंतीने देवांमध्ये चपळ, वेगवान, बलिष्ठ वायुदेव ( पवनदेव ) यांचे अवाहन केले, त्यांच्या सामर्थ्यापुढे जमिनीमध्ये कित्येक वर्षापासुन रुजून बसलेले, मोठमोठाली वृक्षेही सहज हवेत भिरकावुन लावु शकतात. अशा पवन देवांकडुन कुंतीने मंत्र जपुन शक्तिशाली पुत्राची कामना केली, तेव्हा त्यांच्यापासुन कुंतीस पुत्र झाला पांडूने त्याचे नाव भीमसेन असे ठेवले, भीमसेन म्हणजे भयंकर, भीषण. समरभूमीत शत्रूंचे भयंकर नुकसान करणारा, असा भीमसेन. भीमा विषयी असे सांगितले जाते की, लहानपणी कुंतीच्या हातातून निसटून तो दरीत पडला, तेव्हा पांडू, कुंती सर्वजण दरीमध्ये जाऊन पाहतात तर तो ज्या शिळेवर पडला होता ती शिळा पूर्णपणे भंगली, फुटली होती इतका तो बलवान,शक्तिशाली होता. भीम जेव्हा जन्माला तेव्हा त्याच दिवशी हस्तिनापूरमध्ये जेष्ठ कौरव दुर्योधन हा जन्माला होता.

to be continued....

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

हिडिंब राक्षस वध

   गंगाकिनारच्या वनांत प्रवेश  पांडव आपली माता कुंती सहित गंगापार करून नक्षत्रांच्या आधारे दक्षिण दिशेने चालत घनघोर अरण्यात निघाले. पांडव आ...