रविवार, १८ डिसेंबर, २०२२

बाल पांडवांचे, कुंतीसहित आगमन

 

पांडूच्या अकाली निधनानंतर पाचही पुत्र ( पांडव ) आणि कुंती यांना कोणाचाच आधार नव्हता, कुंतीला वाटे की आपण आता हस्तिनापुरी न जाता आपल्या माहेरी कुंतीभोज राज्यात जावे, किंवा बंधू यादव कुळातील कुंती बंधू वसुदेव यांच्याकडे जावे, पण त्या हिमालयातील ऋषी - मुनी, आणि महर्षी यांनी सल्ला दिला की, कुंती तु हस्तिनापुरी जावे आणि तिथे न्याय मागावा, तुला गंगापुत्र समजून घेतील.

पांडव कुंतीसह हस्तिनापुराकडे प्रस्थान

कुंतीने यासाठी होकार देताच सर्व ऋषी - मुनी, महर्षी गण हस्तिनापूरच्या दिशेने निघाले, कौंडिण्य ऋषी, काश्यप मुनी, कुंती, पाच पांडवसहित आपल्या पांडूच्या आणि माद्रीच्या अस्थी घेऊन कुरुजांगल देशाकडे निघाले. वाटेत जाताना युधिष्ठीराने कुतूहलाने कुंतीला विचारले," माता, आपण कोठे चाललो आहोत ?" कुंती म्हणाली " पुत्र, युधिष्ठीर आपण आपल्याच राजवाड्यामध्ये, म्हणजे हस्तिनापुराकडे चाललो आहोत." युधिष्ठीर म्हणाला, कोण कोण आहेत हस्तिनापूरामध्ये ?" कुंती म्हणाली," पुत्र तिथे तुमचे कुरुश्रेष्ठ पितामह भीष्म आहे, त्यांच्या समान श्रेष्ठ धनुर्धर समस्त आर्यवर्तामध्ये कोणीही नाही. राजमाता सत्यवती, हस्तिनापूर नरेश, महाराज धृतराष्ट्र आहेत, माता समान गांधारी, विद्वान, महात्मा, काकाश्री विदुर, मामाश्री शकुनी, आणि धृतराष्ट्र पुत्र १०० बंधू व १ दु:शाला भगिनी इ. अनेक लोक हस्तिनापुरी आहेत."

हस्तिनापुरी पांडवांचे आगमन

जवळपास सतरा दिवसांनी ते हस्तिनापुरात पोहचले, आणि हस्तिनापूरच्या वर्धमान महाद्वारा जवळ पोहचताच माता सत्यवती, पितामह भीष्म, कुलगुरू कृपाचार्य, भीष्माचे काकाश्री बाल्हिक (शांतनु राजाचे मोठे बंधू, यांना आजोळचे राज्य प्राप्त झाल्याने ते बाल्हिक देशाचे राजे झाले मूळ ते कुरु वंशीयच ), बाल्हिक पुत्र सोमदत्त, अंबिका, अंबालिका, धृतराष्ट्र, गांधारी, महात्मा विदुर, गांधार राजकुमार शकुनी, संजय आदी सर्व जण त्यांची आगोदर पासून वाट पाहत होते, सर्वानी सर्व ऋषी मुनी यांचे स्वागत केले, तो तो पर्यंत हस्तिनापूर नगरातील स्त्री - पुरुष, अबाल - वृद्ध सर्व जण तो अप्रतिम सोहळा पाहण्यास आले होते,

भीष्मांनी पुढे होऊन विचारले "आपण हिमालयातून इकडे हस्तिनापूर मध्ये येण्याचे प्रयोजन ? कौंडिण्य ऋषी म्हणाले, " हे कुरुश्रेष्ठ भीष्म तुझ्या पुत्राप्रमाणे असलेला पांडू हा विषय भोगामुळे वनात निधन झाले, पण त्यानी मरण्यापूर्वी खूप आपल्या पत्नी समवेत, तपश्चर्या, साधना, आणि आमची सेवा पण केली, त्यावेळी कुंती जवळील महर्षी दुर्वासा यांनी दिलेल्या मंत्राच्या प्रभावाने कुंतीने तीन पुत्र प्राप्त झालेत." कौंडिण्य ऋषी पाच पुत्रांकडे पाहत म्हणाले, हा सर्वांत जेष्ठ युधिष्ठीर, हा पुष्ट आणि बलवान दिसणारा भीम, हा छोटा संयमी अर्जुन. माद्रीच्या पुत्रांकडे हात करून " हे छोटे माद्री पुत्र नकुल आणि सहदेव आहेत. धृतराष्ट्राकडे पाहत " महाराज, धृतराष्ट्र हे सर्व पांडव आहेत, आज कुंतीसह त्यांचे स्वागत आपण सर्वांनी करावे, आपल्या परिवारात त्यांनाही समावुन घ्यावे." भीष्म म्हणाले, हे राज्य पांडूचेच आहे." पांडव मात्र कधीही न पाहिलेली हस्तिनापूर नगरीचा राजमहाल कुतूहलाने पाहत होते, महाराज धृतराष्ट्र म्हणाले," माझ्या प्रिय पांडूच्या आणि माद्रीच्या उत्तर क्रियेमध्ये कोणतीही कमतरता पडू नये, यज्ञ, दान, धर्म, तर्पण इ. साठी कोणतेही धन, वस्त्र, पशु, रत्न इ. कशाचीही आवश्यक असेल त्या पेक्षा जास्त पुरवावा." असे आदेश दिले.

या नंतर पाचही पांडव आणि कुंती यांचे स्वागत सर्वांनी आनंदाने केले. सर्व प्रजाजणावर पुत्रवत प्रेम करणाऱ्या सम्राट पांडूच्या निधनाने दुःखी होती, आणि बाल पांडव आगमनाने आनंदाश्रूने पार बुडून पण गेली होती, स्वागतानंतर सर्व बाल पांडवांना कुंती सर्व जेष्ठ आणि श्रेष्ठ या सर्वांची ओळख करून देत होती, राजमाता सत्यवती, महाराज धृतराष्ट्र, गांधारी, महात्मा विदुर, इत्यादी श्रेष्ठ, जेष्ठ व्यक्तींच्या चरणस्पर्श करून आशीर्वाद घेतला. आणि आपल्या राजमहालाच्या कक्षात निघून गेले.

पांडूची उत्तरक्रिया हस्तिनापूरमध्ये पार पाडली

पितामह भीष्म, धृतराष्ट्र, यांनी पांडूची उत्तरक्रिया विधिवत पार पाडली, त्यानंतर दान, धर्म, श्राध्द, तर्पण इत्यादी सर्व कार्य हस्तिनापूरमध्ये केले गेले. बाल पांडव आगमनाने सर्व प्रजा राजपरिवारातील सर्वांना त्याचा आनंद झाला पण मात्र शकुनीस याचे फार क्रोध, मत्सर वाटू लागला. शकुनी चेहऱ्यावर खोटा खोटा आनंद दाखवत धृतराष्ट्र यांच्या कक्षात जाऊन धृतराष्ट्राला म्हणतात " अभिनंदन सम्राट, हार्दीक अभिनंदन आपल्या हस्तिनापूर साम्राज्याचे कुरुकुमार पांडव आले आहेत, या सिंहासनाचे खरे वारसदार बरोबर ना महाराज " धृतराष्ट्र आपले अंध डोळे उघडझाप करून शकुनीला म्हणतात " असे का म्हणतोयस गांधार कुमार " शकुनी म्हणाला " महाराज ते सम्राट पांडूचे पुत्र आहेत आणि आर्यावर्तामध्ये राजाचा पुत्र राजाच बनतो अशी परंपरा आहे. आणि पितामह भीष्म आपल्या राज्यात कोणतीच प्रथा, परंपरा, प्रतिज्ञा व रीती केव्हाही मोडणार नाहीत, मोडूही देणार नाहीत." धृतराष्ट्र कपाळाच्या आठ्या करून म्हणाले, " माझा प्रिय पुत्र दुर्योधन कधीच राजा होणार नाही का ? " शकुनी हसुन आपल्या हातातील द्यूत खेळातील सोंगट्या हातावर घासत म्हणाला," सम्राट तो ही राजाचा पुत्र आहे, तो ही युधिष्ठीर नंतर दुर्योधन राजा होऊ शकतो. त्यासाठी मलाच काहीतरी करायला हवे " असे म्हणून शकुनी धृतराष्ट्र यांच्या कक्षातून बाहेर पडले.

to be continued....

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

हिडिंब राक्षस वध

   गंगाकिनारच्या वनांत प्रवेश  पांडव आपली माता कुंती सहित गंगापार करून नक्षत्रांच्या आधारे दक्षिण दिशेने चालत घनघोर अरण्यात निघाले. पांडव आ...