रविवार, १८ डिसेंबर, २०२२

भीमास दहा हजार हत्तींचे बल प्राप्त

 

भीमाची शोधा शोध 

जलक्रीडेच्या नावाखाली दुर्योधन, दुःशासन आदी कौरवांनी भीमसेनास विषप्रयोग करून गंगा नदीमध्ये फेकून दिले, पांडव रात्रभर त्याचा शोध घेत होते. बागेत, राजउद्यानात, नदीकाठी, शिबिरात सर्व ठिकाणी शोध घेतला पण भीम सापडला नाही. भीमसेन हस्तिनापुराकडे गेला असावा, म्हणून दुसऱ्या दिवशी पांडव आणि कौरव जलक्रीडा आटपून हस्तिनापुराकडे निघाले. पण तेथेही तो नसल्याने सर्व पांडव काळजीत पडले, कुंतीला भीमसेन नाहीसा झाला हे समजल्यानंतर ती प्रथम मूर्च्छितच पडली, नंतर शुध्दीत आल्यानंतर मात्र ती रडत राहिली.

जलक्रीडा करून सर्व राजकुमार परतले पण भीमसेन परतला नाही ही वार्ता कळताच महामंत्री विदुर सरळ कुंतीच्या कक्षात आले आणि पांडवांबरोबर विचारपूस केली. काकाश्री विदुर यांनाही भीमसेन नाहीसा झाल्याची वार्ता समजल्यानंतर नंतर त्यांनी आपल्या गुप्तहेरांची तातडीची बैठक बोलावली आणि प्रजेत अफवा पसरू नये म्हणून गुप्तहेरांकरवी गंगा, आणि त्या आसपासचा सर्व परिसर पिंजुन काढा पण भीमसेन सापडला पाहिजे असा आदेश दिला आणि गंगेच्या सर्वत्र परिसरात भीमसेनांची शोध मोहीम सुरु झाली. कुंती काळजीच्या स्वरात म्हणाली " विदुर भावजी ! दुर्योधन आणि भीम यांचे वैर आपण सर्वजण जाणतोच त्यानेच तर काही केले नसेल ना ?, मला खुप काळजी वाटत आहे, की भीमाच्या जीवाचे काही बरे वाईट तर होणार नाही ना ? " विदुर म्हणाले " नाही कुंती वहिनी ! भीमाची शक्ति तुम्ही काय सर्वजण जाणतात. मी माझ्या गुप्त हेरांकरवी सर्व गंगा नदी परिसरात, उद्यानांत शोधा शोध करत आहे आपण काळजी करू नये निश्चित असावे."

' विषस्य विषमौषधं '

इकडे भीमसेन बेशुध्द आवस्थेत गंगेच्या तळाशी जावून पडले, जेव्हा भीम तळाशी पडला तेव्हा भीमाच्या शरीराखाली कित्येक छोटे सर्प दबून मरण पावले. भीमसेनचे संपूर्ण शरीर वनातील वेलीच्या साहाय्याने दुर्योधनाने बांधले होते आणि त्याच आवस्थेत ते गंगेच्या तळाशी राहणारे नागलोकात पोहचले, हा कोण मानव आहे ? म्हणून लहान मोठ्या सर्व नागांनी भीमाचा चावा घेतला. तेव्हा उलट ' विषस्य विषमौषधं '( विष हेच विषावरील प्रभावी औषध ) या न्यायाने भीमाच्या शरीरातील ' काळकूट ' नावाचे विष पूर्णपणे नाहीसे झाले.

भीम शुध्दीवर येताच नागांचे आणि भीमाचे गंगेच्या तळाशी, नागलोकांमध्ये भयंकर युध्द सुरु झाले. भीमास ते छोटे - मोठे नाग जोरजोराने चावा घेऊ लागले, आणि भीमसेन  त्यांना एकेकांना पकडुन जमिनीवर आपटुन त्यांना जीवनीशीच मारू लागला. हे पाहून काही नाग घाबरून वाट मिळेल त्या दिशेनी पळून गेले. काही नाग इंद्रासमान तेजस्वी नागलोकचे ' नागराज वासुकी ' यांच्या जवळ जाऊन झालेली सर्व हकीकत त्रस्त होऊन सांगू लागली. " हे नागेंद्र, आम्हांला वाचवा, आम्हांला वाचवा आमची रक्षा करा ." वासुकी आश्चर्याने म्हणाला " काय झाले एवढे घाबरलेले का आहेत आपण सर्वजण ? " प्राण वाचवुन आलेले नाग सांगु लागले " राजन एका बालकास वेलींनी बांधुन आपल्या या गंगा नदीमध्ये टाकले असावे, तो बालक विष प्राशन करून आला असल्याने आम्ही त्याच्या शरीरावर केलेल्या भयंकर विषाच्या चावा चा त्यास काहीही इजा झाली नाही, उलट तो शुध्दीवर येऊन आपल्या नागलोकांत, आपल्याच नागांना तो मारत आहे, नागेंद्र तो खूप बलवान आहे, दिसण्यावरून तो कोणी राजकुमार असावा असे वाटते." तेव्हा वासुकी अतिशय क्रोधीत होत म्हणाला " आपल्या नागलोकात येऊन आपल्या नागांना कोण हा बालक त्रास देतोय मी त्यास यमसदनीच पाठवतो." असे म्हणून वासुकी निघाले पण नागराज वासुकी यांचा मंत्री आर्यक हे होते, ते शांततेने म्हणाले " राजन ! आपण लगेच क्रोधीत न होता तो बालक नागलोकांत कसा आला ? त्याला कोणी वेलींनी बांधले ? त्यास विष कोणी दिले ? हे जाणणे हे राजाचे प्रथम कर्तव्य आहे. चला आपण सर्वजण त्याच्या जवळ जाऊ." आर्यक नागांना विचारतात " कोठे आहे तो बालक ?"असे म्हणून नागराज वासुकी, मंत्री आर्यक व काही नागांसोबत भीमा जेथे नागांसोबत युध्द करत होते तेथे आले.

भीमास दहा हजार हत्तींचे बल प्राप्त

नागराज वासुकी येताच भीमासेन बरोबर युध्द करणारे नाग शांत होऊन भीमाच्या चारही बाजुला थांबले, भीमास पाहून आर्यक म्हणाले " हे बालक तु कोण आहेस ?, कोठून आलास ?, या नागलोकांत कसे पोहचलास ?, आणि कोणी विष दिले तुला ?" भीम म्हणाला " हे नागराज मी  हस्तिनापूर सम्राट पांडू आणि कुंती यांचा दुतिय पुत्र, भीमसेन, आम्ही गंगाकिनारी जलक्रीडा करत होतो, तेव्हा धृतराष्ट्र पुत्र दुर्योधन याने खिरीमध्ये विषासमान काहीतरी मिसळले असावे त्याने मी मूर्च्छित झालो त्यानंतर मी जागृत झालो तेव्हा नागलोकांत पोहोचलो."आर्यक म्हणाले " कुंती म्हणजे वृष्णी कुळातील यादव शूरसेन यांची कन्या बरोबर ना ?" भीमसेन म्हणाला " बरोबर पण आपल्याला कसे माहित ?" आर्यक हसून म्हणाले " यादव श्रेष्ठ शूरसेन यांचा मी पितामह (शूरसेन यांच्या मातांचे पिताश्री - आर्यक नाग ) या नात्याने तु माझ्या नातवाचा नातू आहेस."

तेव्हा आर्यक आपल्या नातवाच्या नातूला म्हणजेच भीमाला आपल्या छातीशी कवटाळतात, नागराज वासुकी ही या बालकाचा पराक्रम पाहून प्रसन्न होतात, आणि इतर नागांना आदेश देतात,"या बालकास तो कोणत्या कार्याने प्रसन्न होईल ते सर्व करा, त्यास धन, सोने, रत्न जे हवे ते द्यावे." आर्यक म्हणाला " राजन, हा राजकुमार आहे त्यास धन, रत्न देऊन काय उपयोग, जर आपण खरंच प्रसन्न असाल तर भीमसेनास आपल्या नागलोकांतील त्या कुंडाचे रस द्यावे ज्या रसपानाने दश सहस्त्र ( दहा हजार ) हत्तींचे बल प्राप्त होईल." वासुकीने होकार देताच भीमसेनास नागलोकांतील दिव्य कुंडातील रस देण्यात आले, भीमसेन ते एका दिव्य कुंडातील रस एका दमात पिऊन टाकी या प्रमाणे आठ कुंडातील रस पिऊन तृप्त झाल्यावर भीमसेन निद्रिस्त झाला. आठ दिवसानंतर जागृत होऊन जाण्याची परवानगी मागतो तेव्हा आठ दिवस नागलोकांत राहून, भीमाला काही नाग गंगानदी किनारी जाऊन सोडतात.

to be continued...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

हिडिंब राक्षस वध

   गंगाकिनारच्या वनांत प्रवेश  पांडव आपली माता कुंती सहित गंगापार करून नक्षत्रांच्या आधारे दक्षिण दिशेने चालत घनघोर अरण्यात निघाले. पांडव आ...