शरद्वान ऋषी व जानपदी अप्सरा
भीमसेनला नागांपैकी काही जण गंगाकिनारी आणून सोडले, भीमसेन जलक्रीडा केलेल्या जागेकडे पाहत त्या नागांना म्हणाला " मी किती दिवस नागलोकांत होतो ?" ते नाग म्हणाले " हे कुंती पुत्र भीमसेन आपण आमच्या नागलोकात आठ दिवस राहून, आमचे अतिथी होऊन दश सहस्त्र हत्तींचे बळ आपणास प्राप्त करून घेतलात." भीमसेन चिंताक्रांत होऊन "आठ दिवस म्हणजे जेष्ठ आणि इतर बंधू हस्तिनापुराकडे गेले असतील, आणि माझा सर्वत्र शोध पण घेत असतील, माता चिंतीत असेल." त्या नंतर ते नाग भीमास गंगाकिनारी सोडून अदृश्य झाले. भीमसेन त्या उद्यानातून, बागांमधून चालत हस्तिनापुराकडे निघुन गेला.
भीमसेन हस्तिनापुरात जाऊन कुंतीच्या कक्षात जाऊन आपण सकुशल आहे, तेव्हा काकाश्री विदुर, पांडव ही आले, जेष्ठ बंधू युधिष्ठीर, माता कुंती, आणि काकाश्री विदुर यांना प्रणाम करून दुर्योधनाने केलेल्या कालकूट नामक विषप्रयोग, नागांसोबत युद्ध, नागलोकांत भेटलेले वासुकी आणि आर्यक नाग, दश सहस्त्र हातींचें बळ इत्यादी सर्व घडलेला प्रकार भीमाने सांगितला.
भीमाचे एक नाव वृकोदर
युधिष्ठीर म्हणाला " भीम या विषयी तू, कोणाकडेही काहीही बोलू नको. " भीम म्हणाला, नाही दादा मी महाराज काकाश्रीना सर्व काही सांगणार आहे." युधिष्ठीर आवाज चढवून म्हणाला " नाही भीम काकाश्रीना या घटनेचे फार दुःख होईल त्यामुळे तू कोठेही याची वाच्यता करणार नाहीस हा माझा आदेश आहे. " भीम होकारार्थी मान हलवून शांत बसला. कुंती म्हणाली " भीमसेन, युधिष्ठीर जे म्हणतोय ते सत्य आहे, आजच्या समयी तेच करणे योग्य होईल." विदुर पण या विचारला सहमती देतात, आणि म्हणतात " भीम फक्त तुच नाही पण तुम्ही सर्वानी आता अति दक्ष राहिले पाहिजे, अलीकडे हस्तिनापुराचे वातावरण फार दुषित झाले आहे." असे म्हणून विदुर निघून जातात. या घटने नंतर दुर्योधनाने भीमास कित्येक वेळा विष प्रयोग केला पण भीमाच्या पोटात वृक नामक अग्नि असल्या कारणाने ते विष सहज पचवू शकला. म्हणून भीमाचे एक नाव वृकोदर सुध्दा आहे.
दुर्योधन, शकुनी, आणि कनकाचार्य यांनी मिळून पांडवांस मारण्याचा, त्यांना संपविण्याचा खूप प्रयत्न केला. पण विदुर, युयुत्सु, इत्यादी काही हित चिंतकांमुळे ते आपला बचाव करू शकले. कनकाचार्य हे धृतराष्ट्र यांचे राजनीतिज्ञ त्यांचा सल्ला सदैव ते घेत. त्यांच्या मतांनुसार
नासम्यक्क्रुतकारी स्यदुपक्रम्य कदाचन l
कंटको ह्यपि दुच्छिन्न आस्त्रवं जन्योच्चिरम् ll
एकदा शत्रुचा नाश करण्याच्या कामास आरंभ केला की, ते अर्धवट सोडू नये, पायात गेलेला काटा जर अर्धाच मोडून निघाला तर बरेच दिवस वाहणारी जखम बनते.
म्हणून महाराज छोट्या नागास लहान असतानाच मारले पाहिजे. मोठे झाले तर त्याचा त्रास आपल्यालाच अधिक होतो. तो पर्यंत भीमास दुर्योधनाने विषप्रयोग करून नदीमध्ये फेकले हे कळले.
धृतराष्ट्रस या सर्वांची, घटनेची कुणकुण लागली असता, या सर्व खोडकर, चंचल, स्वभावाला योग्य दिशा, आणि संस्कार करण्यासाठी त्यांनी कुलगुरू कृपाचार्य यांच्या आश्रमात सर्व कुरु कुमारांना शिक्षणासाठी पाठवण्याचा निर्णय घेतला. कृपाचार्य हे गौतम गोत्रातील सर्व शस्त्र - शास्त्र, वेद - विद्या पारंगत महान ऋषी होते.
कृपाचार्य कोण होते ?
महान महर्षी गौतम ऋषी, यांचे पुत्र शरद्वान ऋषी हे होते, ते आपले शिक्षण घेत असताना वेद विद्येबरोबरच अस्त्र, शस्त्र याचे ज्ञानात त्यांना अधिक रुची वाटू लागली, धनुर्विद्यामध्ये ते पारंगत होते, त्यांचे तप सामर्थ्य येवढे झाले की, देवराज इंद्राला सुध्दा त्यांचे सिंहासन अस्थिर झाल्याचे वाटू लागले. तेव्हा चिंतीत इंद्राने आपल्या कडील 'जानपदी' नावाची अप्सरा, त्या शरद्वान ऋषींच्या तपाचे भंग, आणि सत्व हरण्यासाठी पाठविली. शरद्वान ऋषी हे त्यावेळी आपल्या तापसाधनेत मग्न होते, कृष्णजिन, धनुष्य, बाण, कमंडलू या मध्ये ते अधिकच महान दिसत. जानपदी जेव्हा शरद्वान ऋषी आली, तिने आपल्या यौवनाच्या बळावर, त्यांना आपल्या सौन्दर्याकडे आकर्षून घेण्याचा प्रयत्न करत होती, शरद्वान ऋषी आपले डोळे उघडताच एक वस्त्र धारण केलेली, सुंदर कन्येला पाहताच यांचे मन कामाने भरून गेले. ते तपस्येतून उठुन, त्या अप्सरेच्या मागे धावू लागले. तेव्हा त्यांच्या शरीरातील वीर्य स्खलित होऊन, धनुष्याच्या, बाणाच्या दोन्ही भागात विभागले गेले, त्यातूनंच दोन आपत्य, एक पुत्र, आणि एक कन्या उत्पन्न झाली. शरद्वान ऋषीना याचे कशाचेही भान राहिले नाही ते सर्व सोडून, जानपदीच्या मागे पळून गेले.
तेव्हा तेथे देवेच्छेनें, योगायोगाने तिथे फिरत असलेल्या हस्तिनापूर सम्राट शंतनू यांना ते एक पुत्र आणि एक कन्या कृष्णाजिन, धनुष्यबाण, कमंडलु यांच्या मध्ये दिसले, तेव्हा ते पाहून शंतनूला वाटले की, हे कोणी तरी महान धनुर्धारी, महर्षी यांची अपत्यें असणार म्हणून त्यांनी आपल्या राज्यात, हस्तिनापूरमध्ये आणून त्यांचे नामकरण सुध्दा केले, शंतनूच्या मनात त्या अपत्यांना पाहतात, दया आली, आणि त्या बालकांवर त्यांची कृपा झाली, म्हणून पुत्राचे नाव कृप आणि कन्येचे नाव कृपी असे ठेवण्यात आले.
पुढे कृप हे कुरु कुळाचे कुलगुरू झाले, आणि भारद्वाज पुत्र द्रोणाचार्य यांच्याशी कृपीचा योग्य समयी विवाह झाला.
to be continued....
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा